IPL 2021 : पंजाबला धक्का ! केएल राहुल रुग्णालयात दाखल, टेस्टमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – IPL च्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्सना आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि.1) रात्री केएल राहुलच्या पोटात दुखू लागल्याने त्याला औषध देण्यात आले. त्यानंतर देखील काहीच आराम पडला नसल्याने त्याला इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले. तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये त्याला तीव्र अ‍ॅपेंडिक्स असल्याचे समोर आले.

यावर उपचारासाठी केएल राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाब किंग्सने केएल राहुल याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. राहुलने IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने सात सामन्यात 331 धावांसह ऑरेंज कॅप स्वत:कडे राखली आहे. केएल राहुलने 7 मॅचमध्ये 66.20 च्या सरासरी आणि 136.21 च्या स्ट्राईक रेटने रन्स बनवल्या आहेत.

केएल राहुल नसताना संघाचे नेतृत्व कोणारकडे देण्यात येणार यासंदर्भात काहीही सांगण्यात आले नाही. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला असून 4 सामने त्यांनी गमावले आहेत. पंजाबचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू मयंक अग्रवालही दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नाही, त्यामुळे पंजाबला आता राहुलच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे.