मुंबई HC मध्ये वकिलाने दाखल केली याचिका, म्हणाले – ‘BCCI ने कोरोना काळात IPL खेळवून कमावलेले तेवढे पैसे किंवा 1 हजार कोटी वैद्यकीय मदतीसाठी द्यावेत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर BCCI ने अखेर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 4) घेतला आहे. पण, इथेच BCCI चे संकट संपले नाही. बीसीसीआयने कोरोना संकटातही आयपीएल खेळवून कमावलेल्या पैसे किंवा 1 हजार कोटी वैद्यकीय मदतीसाठी आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी दंड म्हणून द्यावेत, अशी याचिका एका वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या संवेदनशील काळात IPL चे आयोजन केल्याबद्दल बीसीसीआयला दोषी धरले पाहिजे. आयपीएल ही काय अत्यावश्यक सेवा आहे का? BCCI ने समस्त देशवासियांची माफी मागायला हवी, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

वकील वंदना शाह यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल केली होती, त्यावेळी त्यात IPL रोखण्याची मागणी केली गेली होती. पण, IPL गव्हर्निंग काऊन्सिलने तातडीची बैठक बोलावून IPL स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक वृद्धीमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. दरम्यान BCCI ने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हा निर्णय गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत BCCI च्या प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि या स्पर्धेशी संबंधित प्रत्येकाच्या सुरक्षितेचा आणि आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. या कठीण काळात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्याचा आणि त्यांच्या चेह-यावर हास्य पुलवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता ही स्पर्धा स्थगित केली असून प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबीयांकडे जाऊ शकतात. बीसीसीआय या सर्वांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.