IPL 2021 : केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे IPL मधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयंक अग्रवालने दिले उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL च्या यंदाच्या मोसमात संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्जना आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार केएल राहुल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला तीव्र अ‍ॅपेंडिक्स असल्याचे समोर आले. त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाब किंग्जचा सलामीवीर मयंक अग्रवाल याच्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मयंकला राहुलच्या पुनरागमनाबाबत विचारले असता त्याने स्पष्ट उत्तर देण्यास टाळले. त्यामुळे केएल राहुल हा उर्वरीत सामन्यांना मुकणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र तो लवकर बरा होऊन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात संघात पुनरागमन करु शकेल, अशी शक्यता मयांकने व्यक्त केली आहे.

कर्णधार केएल राहुल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (दि.1) रात्री केएल राहुलच्या पोटात दुखू लागल्याने त्याला औषध देण्यात आले. त्यानंतर देखील काहीच आराम पडला नसल्याने त्याला इमर्जन्सी रुममध्ये नेण्यात आले. तिकडे त्याच्यावर टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये त्याला तीव्र अ‍ॅपेंडिक्स असल्याचे समोर आले. त्यानंतर राहुलवर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे तो उर्वरीत सामने खेळू शकणार नाही. त्याच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रीया यशस्वी झाली असून सध्या तो क्वारंटाइनमध्ये आहे. त्यानंतर तो संघात पुन्हा पुनरागमन करेल, असं संघाच्या व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

केएल राहुलच्या जागी मयंक अग्रवाल पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. दिल्लीसोबत झालेल्या समान्यात त्याने राहुलची जागा घेतली. सामना झाल्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने मयंकची छोटेखानी मुलाखत घेतली. त्यावेळी त्याला केएल राहुलच्या पुनरागमनासंदर्भात विचारण्यात आले. राहुल आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार का ? असे विचारले असता, त्यावर मयंकने नक्कीच नाही असं सांगत राहुलच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली पण नेमकी तारीख सांगणं अशक्य असल्याचेही तो म्हणाला.

मयंक अग्रवाल म्हणाला, केएल राहुल स्पर्धेतून बाहेर गेलेला नाही. मात्र त्याची मला आठवण येतेय. अतिशय प्रांजळपणे सांगायचं झालं तर आम्हाला इथ येऊन संघासाठी खेळता आलं यासाठी आम्ही नक्कीच नशीबवान आहोत. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण देश आणि जग मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. मी खरंच स्वत:ला भाग्यशाली समजतो.

दरम्यान, केएल राहुल याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्यास सांगितले आहे. त्याला पूर्वीप्रमाणे मैदानात उतरण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केएल राहुल पुढील आयपीएलचे उर्वरित सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.