IPL Auction 2021 : ग्लेन मॅक्सवेलवर RCB ने लावली मोठी बोली, 14.25 कोटींना घेतले संघात

चेन्नई : वृत्तसंस्था –  आयपीएल 2021 च्या लिलावाला चेन्नई येथे सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून या लिलावाची क्रिकेटप्रेमी जोरदार चर्चा करत होते. या लिलावत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपले नशीब अजमावत आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्यावर जोरदार बोली लागल्याचे पहायला मिळाले. मॅक्सवेलची बेस प्राइज यावेळी दोन कोटी रुपये एवढी होती. मात्र, लिलावात सर्वच संघांनी त्याच्यावर बोली लावल्याचे पहायला मिळाले. अखेर आरसीबीने मॅक्सवेलवर सर्वोत्तम बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे.

मॅक्सवेल याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळाले. अखेर आरसीबीने मॅक्सवेलला 14 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या संघात घेतले. चेन्नई आणि आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात घेण्यासाठी एकवर एक बोली लावली. दोन्ही संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळाले. मागच्या सिझनमध्ये मॅक्सवेलला चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-20 मालिकेत त्याने धडाकेबाज फलंदाजी केल्याने यावेळी त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला होता की, जर कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवरचा दबाव कमी करायचा असेल तर मॅक्सवेल याला आरसीबीने आपल्या संघात स्थान द्यायला हवे. तसेच कोहलीने सलामीला यायला पाहिजे. परंतु कोहली आणि संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतात, यावर अवलंबून असेल. मॅक्सवेलची कामगिरी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चांगली होऊ शकते, असे गौतम गंभीर याने म्हटले होते.