IPL 2020 : लोकेश राहुलनं उघड केलं यशाचं ‘रहस्य’, मॅचपुर्वी ‘या’ खेळाडूशी बोलताना प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधार लोकेश राहुलने आयपीएल 2020 चे पहिले शतक ठोकले आणि सामन्यात नाबाद 132 धावा केल्या. लोकेश राहुलच्या या दमदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाला या सामन्यात 97 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. शतकी पारी खेळल्याबद्दल लोकेश राहुलला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

सामन्यात 132 धावांची नाबाद खेळी खेळणार्‍या लोकेश राहुलने या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या यशाचे रहस्य उघड करत सांगितले की, सामन्यापूर्वी मी ग्लेन मॅक्सवेलशी बोलत होतो आणि त्यांना सांगत होतो की आजकाल माझे लक्ष लागत नसून मला चांगली फलंदाजी करता येत नाही तर यावर त्यांनी मला सांगितले की तुम्ही चेष्टा करत आहात तुम्ही खूप चांगले खेळत आहात. खरं सांगायचं तर मी याबद्दल घाबरलो होतो.

लोकेश राहुल पुढे म्हणाले की, मी विचार करीत होतो की जर मी क्रीजवर वेळ घालवला तर पुढे जाऊन दोन मोठे हिट लावून दबाव हटवू शकतो, परंतु कर्णधार म्हणून आपल्याकडे जास्त वेळ शिल्लक नसतो. पण मी नेहमी एक खेळाडू म्हणून स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करतो. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरूद्ध आमची रणनीती स्पष्ट होती, कारण आम्हाला माहित आहे की त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे आम्हाला स्कोअर बोर्डवर मोठी धावसंख्या करावी लागेल.

पुढे लोकेश राहुलने युवा रवी बिश्नोईचे कौतुक केले आणि सांगितले की सुरुवातीला महाग पडणाऱ्या गोलंदाजीनंतरही त्याने चांगले पुनरागमन केले. मी प्रथम त्याला अंडर -19 वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहिले होते. मात्र तो एबी डिव्हिलियर्स आणि अ‍ॅरॉन फिंचसमोर गोलंदाजी करण्यात नर्व्हस होत होता. तरीही त्याने चांगली कामगिरी केली.