नेस वाडिया प्रकरणामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचं निलंबन होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध उद्योजक नुस्ली वाडिया यांचा पुत्र नेस वाडिया यांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे वाडिया आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बीसीसीआयने याप्रकरणी शुक्रवारी बैठक बोलावली आहे. याप्रकरणामुळे पंजाबच्या टीमचं निलंबन होऊ शकतं.

ड्रग्स बाळगणे गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली आहे. चेन्नई आणि राजस्थानच्या टीमशी अधिकृत असलेल्या काही जणांवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यामुळे या दोन्ही टीमचं दोन वर्षांसाठी निलंबन झालं होतं. या प्रकरणामध्ये एका टीमचा सहमालक दोषी आढळला असून त्याला शिक्षाही झाली आहे.

काय आहे आयपीएलचा नियम
आयपीएलच्या नियमानुसार सहभागी संघातील कोणताही अधिकारी अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नसावा. आयपीएलच्या नियम १४-२ नुसार आयपीएल टीमशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने मॅच सुरु असताना किंवा मैदानाबाहेर अशी वर्तणूक करु नये, ज्यामुळे आयपीएल, बीसीसीआय, टीम, खेळाडू आणि खेळ यांचं नाव आणि प्रतिष्ठा खराब होईल. नियम १४-२ चा भंग झाला तर चौकशी समिती आणि लोकपाल त्या टीमचं निलंबन करू शकतात.

वाडिया उद्योगसमूहाचे वारसदार नेस वाडिया यांना जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेस वाडिया यांना मार्च महिन्यात जपानच्या ‘न्यू चिटोज’ विमानतळावर अटक करण्यात आली होती. नेस वाडिया विमानतळावरून २५ ग्रॅम गांजाची तस्करी करण्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.