IPL 2019 : ‘या’ कारणामुळे प्ले ऑफच्या लढतींची वेळ बदलली

मुंबई : वृत्तसंस्था –आयपीएलच्या १२ व्या मोसमाची रंगत वाढत असून दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. तर प्ले ऑफमधील दोन जागांसाठी चुरस वाढली आहे. याच दरम्यान प्ले ऑफच्या लढतींच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.

नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी हे सामने सुरू होणार आहेत.सध्या रात्रीचे सामने आठ वाजता सुरू होत आहेत. मात्र प्ले ऑफचे सामने आठ ऐवजी साडे सात वाजता सुरू होणार आहेत. तर या सामन्यासाठी नाणेफेक सात वाजता होणार आहे. शनिवारी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएलच्या या मोसमातील पहिला प्ले ऑफचा सामना सात मे रोजी चेन्नईमध्ये होणार आहे तर दुसरा सामना आठ मे रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजयी संघात दहा मे रोजी विशाखापट्टनम येथे सामना होणार आहे. तर अंतिम सामना १२ मे रोजी होणार आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामन्यांचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीशी आमची चर्चा झाली असून, प्ले-ऑफचे सामने आठ ऐवजी साडे-सात वाजता सुरू होतील. तसेच प्ले ऑफच्या सामन्या दरम्यान महिलांच्या टी -२० सामने खेळले जाणार आहेत. हे सामने साडेसात वाजता सुरू होणार आहेत. याआधी स्टार स्पोर्टने देखील प्ले ऑफच्या सामन्यांची वेळ बदलण्याची मागणी केली होती.