पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – IPS Amitabh Gupta | मावळते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा – Maharashtra Prison Department) अमिताभ गुप्ता यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज गुरुवारी (दि. १८) वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यातून पोलीस आयुक्त ते कारागृह महानिरीक्षक तथा अप्पर पोलीस महासंचालक असा प्रवास गुप्ता यांनी उलगडला. पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले.
आयुक्तांचा रोल नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा होता आणि कारागृह महानिरीक्षक झाल्यानंतर कैद्यांना सगळं काही मिळत आहे की नाही हे पाहण्याचे काम केले, अशी डबल ड्युटी निभावली असल्याचे गुप्ता यांनी मिश्कीलपणे सांगितले. तसेच पुण्यात काम करत असताना सोशल मीडियाचा (Social Media) प्रभावी वापर करत मराठी, हिंदी बरोबर इतर भाषेत प्रेसनोट काढल्या त्यामुळे इतर माध्यमांनी दखल घेतली असे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी त्यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ” कैद्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांवर अनेक जण फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा देण्यात येत असल्याची टीका करत आहेत. पण मला काहीच फरक पडत नाही. एकदा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो हे बघा. मग फाईव्ह स्टार हॉटेल आणि कारागृह यातील फरक समजेल अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे उपस्थित होते.
अमिताभ गुप्ता म्हणाले, ” कारागृह महानिरीक्षक म्हणून मला भरपूर शिकायला मिळाले. ज्या काही गोष्टीबाबत कारागृहावर टीका झाली. त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या. मानवी अधिकाराच्या अनुषंगाने कैद्यांना जे काही देता येत होते ते त्यांना दिले आहे. कारागृहातील अनेक चुकीच्या गोष्टी बदलल्या.
अनेक कारागृहात मोबाईल सापडत होते. त्यासाठी राज्यातील ३० कारागृहात फोनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी थांबल्या आहेत. यानंतर अनेक कारागृहात सीसीटीव्ही बसविल्याने सुरक्षितता आणि पारदर्शकता आली. कैद्यांच्या लहान लहान मागण्या होत्या. गाडी, स्वेटर, गरम पाणी, वॉटर कुलर, वाशिंग मशीन या गोष्टी उपलब्ध करून दिल्या.
कारागृहात भजन स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या. पूर्ण समर्पण भावनेतून काम केले. ज्याच्या कामाचे त्याला श्रेय दिले. कैद्यांचा दृष्टीकोन बदलला. नवीन कारागृहासाठी पालघर, नगर, येरवडा येथील कामाला गती मिळाली. पुणे पोलिस आयुक्त पद सोडल्यानंतर मानसिकरित्या स्थिरस्थावर व्हायला जवळपास एक महिना लागला. निवृत्ती नंतर पुण्यातच वास्तव्यास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी कारागृहाच्या नियमावलीवर बोट ठेवत त्यामध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे म्हंटले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा