हेमंत करकरेंबद्दलच्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा IPS असोशिएशनकडून निषेध

भोपाळ : वृत्तसंस्था – भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या विधानाचा आयपीएस (IPS) संघटनेने निषेध केला आहे. अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना सर्वोच्च बलिदान दिले. साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करतो. सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे असे आयपीएस असोशिएशनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भोपाळमधील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा

गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना साध्वी प्रज्ञा यांनी दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला. तो तपास अधिकारी सुरक्षा आयोगाचा सदस्य होता. त्याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले की पुरावे नसतानाही साध्वीला तुरुंगात का डांबले. यावर हेमंत करकरे यांनी सांगितले की मी काहीह करेन पण साध्वीविरोधात पुरावे सादर करणारच, मी साध्वीला सोडणार नाही असा आरोप साध्वी प्रज्ञाने केला.

हेमंत करकरे याने हा देशद्रोह केला होता. तो मला विचारायचा की खरं जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावं लागेल का. मी करकरे यांना सांगितले की तुमचा सर्वनाश होईल. त्याने मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी मी तुरूंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वीने केले होते.