रिअल लाईफ हिरो ! ‘हे’ मराठी IPS अधिकारी बनले 40000 लोकांसाठी ‘देवदूत’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे उद्योग धंदे तसेच व्यवसाय बंद पडले. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या मजुरांची अवस्था दाखवणारे फोटो, व्हिडीओ आपण सोशल माध्यमात पाहिले असतील. त्या मजुरांना सामाजिक संस्था तसेच सरकारकडून मदत देण्यात आली. मात्र, तेलंगणामध्ये एका मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यानं आपल्या राज्यातील मजूर व वृद्धांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे. त्यामुळे या IPS अधिकाऱ्यास त्या भागात अन्नदाता म्हणूनही ओळखलं जातं.

देशात २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात रोज कमवून खाणाऱ्या मजुरांवरती उपासमारीची वेळ आली होती. पण महेश भागवत हे येथील लोकांना अक्षरशः देवदूत बनून मदतीस आले. तेलंगणामधील ४१ वृद्धाश्रम त्यांनी दत्तक घेतले असून, तेथील १ हजार ६०० वृद्धांच्या जेवणाची सोय देखील ते करत आहे. निराधार २० हजार आणि ४० हजार मजुरांच्या अन्नाची सोय त्यांनी केली. तसेच या मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत मदत केली आहे.

कोण आहेत IPS महेश भागवत

महेश भागवत हे मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावाचे रहिवाशी असून, सध्या ते तेलंगणामध्ये IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मणिपूर-त्रिपुरा केडरमध्ये इंफाळला सहाय्यक पोलिस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नेमणूक झाली होती. त्यानंतर आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद येथे SP म्हणून नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त असणारा हा भाग, येथील चार वर्षाच्या काळात १४५ नक्षलवादी शरण आले तेही कोणत्याही बळाचा वापर न करता. मानवी तस्करीच्या विरुद्ध जो लढा त्यांनी उभारला त्याची दाखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. यासाठी अमेरिकेच्या गृहखात्याने त्यांना ‘२०१७ ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अ‍ॅवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला.