‘या’ IPS नं शेअर केले बँकेचे डिटेल्स, रतन लालच्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी पुढे आले हात

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली हिंसाचारात मरणार्‍यांची संख्या आता 41 झाली आहे. हिंसाचारग्रस्त भागात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. जसी पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी रतनलाल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केले आहे.

ट्विटरवर हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना बोथरा यांनी म्हटले की, मला माहित नाही रतनलाल सीएएच्या समर्थनात होते की विरूद्ध. आम्ही फक्त एवढेच जाणतो की, ते केवळ 42 वर्षांचे होते. जेव्हा ते आपल्या कुटुंबासाठी कर्तव्य बजावत होते, तेव्हा त्यांची पत्नी, दोन मुली आणि मुलगा त्याची वाट पाहात होते. आयपीएस बोथरा यांनी एका फोटोसह ट्विट करताच ते ताबडतोब वायरल झाले.

या ट्विटनंतर अनेक लोकांनी विचारले की आम्ही या कुटुंबाची मदत कशी करू शकतो. यानंतर गुरूवारी आयपीएस बोथरा यांनी हेड कॉन्स्टेबलच्या पत्नीच्या बँक डिटेल्स शेयर केल्या. त्यानंतर काही वेळात कमेंट येऊ लागल्या, ज्यामध्ये काही लोकांनी खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, पण खाते निष्क्रिय दिसून येत होते.

यानंतर आयपीएस बोथरा यांनी बँक अधिकार्‍यांशी चर्चा करून खाते अ‍ॅक्टिव्हेट केले. याबाबत त्यांनी रतनलाल यांची पत्नी, त्यांचा भाऊ, बँक मॅनेजर आणि एसएचओ यांनाही सांगितले. यानंतर लोकांनी खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सुरूवात केली आणि त्याचे स्क्रीन शॉट ट्विटर अकांउन्टवर शेयर करण्यास सुरूवात केली.

दिल्ली सरकारनेसुद्धा रतनलाल यांच्या कुटुंबियांना 1 करोड रूपये देण्याची घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभेत सीएम अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, दिल्ली सरकारच्या पॉलीसीनुसार, आम्ही रतनलाल यांच्या कुटुंबाला एक करोड रूपये देऊ.

तत्पूर्वी किंग्जवे कॅम्पच्या न्यू पोलीस लाईन्स दिल्ली पोलिसांनी शहीद रतनलाल यांना सलामी दिली. याप्रसंगी पोलीस कमिश्नर अमूल्य पटनायक आणि रतनलाल यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी पटनायक म्हणाले, हा आमच्यासाठी दु:खद दिवस आहे. रतनलाल धाडसी पोलीस कर्मचारी होते.

You might also like