मराठमोळ्या महिला IPS चा बिहारमध्ये ‘डंका’, उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी सायली सावळाराम धुरत यांनी बिहारमध्ये आपला डंका बजावला आहे. नेपाळ सीमेवरील अररिया जिल्ह्यात काम करीत असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रचनात्मक आणि सुरक्षा संबंधी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी गौरव करण्यात आला. इतक्या लहान वयात हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या एकमेव आहेत.

सायली धुरत या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत. त्या २०१०च्या आयपीएस बॅचच्या आहेत. बिहार केडर मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या १० वर्षात बिहारमधील विविध जिल्ह्यात काम केले. पाटणा सिटी एस पी ईस्ट या पदावर काम करताना त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास लावून स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या बिहार -नेपाळ सीमेवरील अररिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. नेपाळ आणि भारताची सीमा रेषा खुली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात काम करताना खुपच दक्ष रहावे लागते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुरक्षा आणि मतदार जागृती अभियान राबविण्याविषयी त्यांनी एक विशेष प्रकल्प तयार केला होता. त्यामुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शांततेने मतदान प्रक्रिया पार पडली. सायली धुरत यांनी आतापर्यंत ५ निवडणुकांमध्ये काम केले आहे.

आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सायली यांनी आनंद व्यक्त करीत लोकांना धन्यवाद दिले. याबाबत सायली धुरत यांनी सांगितले की, खरं तर विश्वास बसला नाही. इतक्या कमी वयात हा पुरस्कार मिळेल. अररिया जिल्हा हा जातीय दंग्यांसाठी खूप संवेदनशील आहे. त्या जिल्ह्यात निवडणुका शांततेत पार पडणे हे सर्वांसाठी मोठे आव्हान असते. मी निवडणुकीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत एक इनोव्हेशन केले होते. ते निवडणुक आयोगाला पाठविले होते. ते आयोगाला विशेष पसंत पडले होते. माझ्याबरोबर देशभरातील एकूण १९ जणांना पुरस्कार देण्यात आला. त्यात पोलीस अधीक्षक असलेली मी एकटी होते. बाकीचे पोलीस महासंचालक, सेवानिवृत्त अधिकारी इतक्या मोठ्या पदावरील अधिकारी होते. बिहारमध्ये गेली १० वर्षे काम करीत आहे. बिहार खरोखर बदलत आहे असे वाटते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like