२१ दलितांना फोडून काढले ; महिला IPS अधिकाऱ्याचे बेताल वक्तव्य  

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. ‘अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना मी फोडून काढले आहे. अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त मारते’, असे धक्कादायक वक्तव्य भाग्यश्री नवटके यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या बेताल संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या महिला आयपीएस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माजलगावच्या डीवायएसपी असलेल्या भाग्यश्री नवटके यांच्या बेताल वक्तव्याप्रकरणी सर्व स्तरांतून टीकेचा भडीमार होत आहे. नवटके यांच्या विरोधात बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी तक्रार दाखल केली असून नवटके यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा पोटभरे यांनी दिला आहे. तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते. जर दलित असता तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. अटक करण्याऐवजी मी त्याला कशी मदत केली व दलितांना कसा धडा शिकवला, असं बेतालपणे बोलत असल्याचे त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत. याबरोबरच या व्हिडीओ क्लिपमध्ये त्या स्वतः मराठा असल्याचे सांगत आहेत. भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.