माजी आयपीएस(IPS) आधिकऱ्याच्या सुसाईडनोटमध्ये ममतांचा उल्लेख, भाजपची अटकेची मागणी

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण निवृत्त आयपीएस (IPS)अधिकारी गौरव दत्त यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर आता भाजपनं ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करीत अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी आता दत्त यांची पत्नी आणि भाजप नेते मुकुल रॉय सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

काय आहे प्रकरण ?

गौरव दत्त हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यांनी राहत्या घरी हाताची नस कापून आत्महत्या केली. ज्यावेळी त्यांची पत्नी घरी पोहोचली तेव्हा दत्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये गौरव दत्त यांनी ममतांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं असल्याचा उल्लेख केला होता. ममतांनी त्यांना ‘कंपलसरी वेटींग’ वर ठेवलं आणि ३१ डिसेंबर २०१८ रोजी निवृत्त झाल्यानंतर मिळणारे पैसे देखील दिले नाहीत असा आरोप केला आहे. कंपलसरी वेटींगमध्ये अधिकाऱ्याची पोस्टींग केली जात नाही. त्याला त्याच ठिकाणी ठेवलं जातं. ही एक दंडात्मक कारवाई असते.

भाजपकडून ममतांना अटक करण्याची मागणी

भाजप ममतांमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. भाजपच्या राज्यव्यापी रथयात्रेला पश्चिम बंगाल सरकारनं परवानगी दिली नव्हती. त्यावरून हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील पोहोचलं होतं.दरम्यान याप्रकरणी आता ममतांची सीबीआय मार्फत चौकशी करत अटक करा अशी मागणी भाजपनं केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनं केलेली राज्यातील ही पहिलीच केस आहे.