सुशांतच्या अकाऊंटमधून काढलेल्या 50 कोटी अन् इतर तपासासाठी गेलेल्या IPS ला ‘क्वारंटाईन’च्या नावावर ‘हाऊस अरेस्ट’ केलं गेलं : बिहार DGP

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईला गेलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहारचे पोलिस प्रमुख गुप्तेश्वर पांडे संतापले आहेत. मुंबई पोलिसांनी एका आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन ठेवण्याच्या नावाखाली ‘अटक’ केली असल्याचा आरोपही बिहारच्या डीजीपींनी केला. पांडे म्हणाले की, मुंबई पोलिस आरोपी रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. ते या प्रकरणात अजिबात सहकार्य करत नसून त्यांचे हे कृत्य आज संपूर्ण देश पहात आहे.

डीजीपींनी माध्यमांना सांगितले की, “गेल्या चार वर्षात सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यात सुमारे 50 कोटी रुपये जमा झाले होते, परंतु आश्चर्य म्हणजे ते सर्व पैसे काढून घेण्यात आले. एका वर्षात त्यांच्या खात्यात 17 कोटी रुपये जमा केले गेले. ज्यातील 15 कोटी रुपये काढले गेले होते. हा तपास करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही का? आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना (मुंबई पोलिसांना) प्रश्न विचारू कि, अशा प्रकारच्या घटना का रोखल्या जातात? ”

बिहारचे डीजीपी म्हणाले, “आयपीएस अधिकाऱ्याचा एक मान असतो. मुंबई पोलिस आपल्या ज्युनियर अधिकाऱ्यांना काय संदेश पाठवू इच्छित आहेत. चोरांसारखे जाऊन एका आयपीएस अधिकाऱ्याला हाउस अरेस्ट केले जाते. काही दिवसांपूर्वी आमच्या पोलिस अधिकाऱ्याला धक्का देत कैदी व्हॅनमध्ये बसविण्यात आले. मी मुंबई पोलिसांची इज्जत वाचवण्यासाठी माध्यमांना सांगितले की, असे काही घडलेले नाही. पण असे झाले होते, कारण प्रत्येकाने हे दृश्य पाहिले होते. ”

पांडे म्हणाले की, आज मुंबईची परिस्थिती बिकट झाली आहे. जर मी या प्रकरणात आपली भूमिका निभावण्यासाठी मुंबईला गेलो तर मलाही अटक होण्याची भीती आहे. ते म्हणाले की, सुशांतच्या आत्महत्येच्या आरोपानंतर त्यांनी मुंबई पोलिस प्रमुखांशी बर्‍याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी सुशांतचा मृतदेह त्याच्या खोलीतून सापडला त्याच दिवशी मी मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा फोन उचलला नाही किंवा परत कॉल केला नाही. एवढेच नाही तर, मी व्हॉट्सअ‍ॅपला त्याविषयी जाणून घेण्यासाठी मेसेज केले, तरीही उत्तर देण्यात आले नाही. असं कुठे होत का ? आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. मुंबई पोलिसांच्या सहकार्याशिवाय बिहार पोलिस तिथे चौकशी करु शकत नाहीत.”

पांडे पुढे म्हणाले, “आम्हाला सुशांत प्रकरणात सत्य समोर आणायचे आहे परंतु आम्हाला पाठिंबा मिळत नाही. मात्र , आमचासुद्धा आग्रह आहे की आम्ही हे प्रकरण सोडणार नाही.” मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना काहीही दिले नाही, असा आरोप डीजीपीने केला. एफएसएल अहवाल, पोस्टमार्टम रिपोर्ट, पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ फुटेज, सुशांतच्या घरातून सापडलेल्या वस्तू काहीच नाही. एवढेच काय ते काही दाखवायलाही तयार नाहीत तर ते देणं फार लांबच राहील.

पांडे म्हणाले, “मुंबई पोलिस सुशांतच्या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. मुंबई पोलिसांची संपूर्ण कारवाई रिया चक्रवर्ती बोलत असल्याप्रमाणेच आहे. रिया म्हणत आहे की बिहार पोलिस सुशांत प्रकरणाची चौकशी करू शकत नाहीत. महाराष्ट्र पोलिसही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करीत आहेत. “