अमेरिका – इराण युध्दाच्या उंबरठ्यावर, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार ‘हा’ थेट परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणच्या कुदस फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानीच्या निधनानंतर संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटू लागली आहे. अमेरिकेच्या या हल्ल्याचा ‘धोकादायक बदला’ घेण्याची इराणने धमकी दिली आहे. जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. या दोन देशांमधील युद्धाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या हल्ल्यामुळे आधीच असलेल्या महागाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ६ गोष्टी बदलणार आहेत.

१. महागाई वाढणार
आर्थिक मंदीच्या काळात ही चिंताजनक बातमी आलीय. कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींचा जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर परिणाम होणार आहे. यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे.

२. शेअर बाजार
संभाव्य युद्धाच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सुलेमानी ठार झाल्यानंतर शेअरची विक्री करत पैसे काढून घेणे पसंत केलं. यामुळे आशियातल्या प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली होती.

३. जीवनावश्यक वस्तू महागणार
पेट्रोल – डिझेल महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. भाज्या, फळं, दूध अशा वस्तूंच्या किंमती वाढू शकतात, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

४. पेट्रोल – डिझेलचा भडका
भारत अरब देशांसह इराणमधूनही क्रूड ऑइलची आयात करत होता. मात्र, अमेरिकेनं घातलेल्या निर्बंधानंतर भारताने इराणकडून तेल घेणं बदं केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते.

५. लग्नाच्या हंगामात महागाईची झळ
सध्या लग्नाचा हंगाम आहे. त्यामुळे सोनं- चांदीच्या वाढलेल्या किंमती आणि त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव पाहता लग्नसराई चांगलीच महागणार आहे.

६. सोनं-चांदी महागलं
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू ओढवल्याने आखाती देशात तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय. त्यामुळे सोनं महाग झालंय. सोन्यामध्ये तेजीचं प्रमाण आजही कायम होतं. आठवडा संपताना सोन्याच्या दरात ७५२ रुपये प्रतितोळा वाढ झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या भावात ९६० रुपयांची वाढ झालीय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/