Coronavirus : इराणमध्ये ‘कोरोना’ व्हायरसची दहशत, ‘संसर्ग’ रोखण्यासाठी 85000 कैद्यांना सोडलं

तेहरान : वृत्तसंस्था – कोरोनो व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी इराणने राजकीय कैद्यांसह सुमारे 85,000 कैद्यांची तात्पूरती सुटका केली आहे. सरकारने मंगळवारी (17 मार्च) ही माहिती दिली. न्याय विभागाचे प्रवक्ते घोलमहोस्सिन इस्माइली यांनी सांगितले की, सोडण्यात आलेल्या निम्म्या कैद्यांचा संबंध देशाच्या सुरक्षेशी होता. प्रवक्त्याने हेदखील सांगितले की, कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी कारागृहातही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत.

इराणमध्ये सोमवारी एका दिवसात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने 129 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर मृतांचा आकडा वाढून 853 पर्यंत पोहचला. तर 14,991 लोकांना संसर्ग झाला आहे. इराणच्या सरकारी चॅनलने ही माहिती दिली. पश्चिम आशियात इराण सर्वात प्रभावित देश आहे. महामारीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत सोमवारी सर्वात जास्त मृत्यू येथे झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकार्‍यालाही संसर्ग झाला आहे.

इराणमध्ये चार महत्वपूर्ण धार्मिक स्थळ बंद
इराणमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी देशातील शिया धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी टीव्हीनुसार, कोरोना व्हायरस विरोधी मुख्यालय आणि आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानुसार मशहद येथील इमाम रजा, कौम येथील फातिमा मासुमा आणि तेहरान येथील शाह अब्दुल-अजीम पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका अन्य आदेशात कौम येथील जमकरान मस्जिद सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील 24 तासात 862 लोकांचा मृत्यू
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगभरात 24 तासात जीवघेण्या कोरोना व्हायरसने 862 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये इटलीत 368, इराण 245 आणि स्पेनमध्ये 152 मृत्यू झाले आहेत. डब्ल्यूएचओच्या कोरोना व्हायरसच्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसने मरणारांची संख्या वाढून 6606 झाली आहे. मागच्या 24 तासात या व्हायरसची 13,903 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

जगभरात सध्या 167,511 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत 81,434 लोकांना संसर्ग झाला असून सुमारे 3218 लोकांचा मृत्यू झाला आहे.

डब्ल्यूएचओनुसार मागील 24 तासात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 14 आणि चीनच्या बाहेर 848 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 3218 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय हा व्हायरस जगातील 151 देशांत पसरला आहे. चीनसह अन्य देशांमधील स्थिती खुप गंभीर आहे.