हातचलाखीने पैसे उकळणारे इराणी गुन्हेगार अटकेत

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन – हातचलाखीने दुकानदारांचे पैसे लुबाडणाऱ्या दोन इराणी गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे सुट्टे पैसे मागत दुकानातील गल्ल्यातील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. हिंजवडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बावधन येथील एसबीआय बँकेजवळून अटक केली.

शौकत खानजमान इराणी (वय-५० रा. शिवाजीनगर, पुणे), बाबा तारील्ला इराणी (वय-४० रा. शिवाजीनगर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बावधन येथील राकेश सुपर मार्केटमध्ये चोरीची घटना घडल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरु केला.

त्यांच्या पोषाख आणि चेहरेपट्टीवरून शोध घेत असताना पोलीस नाईक आतिक शेख यांना सुपर मार्केटमध्ये चोरी करणारे बावधन येथील एसबीआय बँकेजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी एसबीआय बँकेजवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी सुपर मार्केटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास ५०० रुपयांचे सुट्टे मागण्याच्या बहाण्याने दुकानातील गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते

वरीष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे प्रमुख अधिकारी अनरुद्ध गिझे, एम.डी. वरुडे, सहायक पोलीस फौजदार वायबसे, पोलीस हवालदार बाळु शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, पोलीस नाईक आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, पोलीस शिपाई सुभाष गुरव, अमर राणे, इनकसिंग गुमलाडु, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख यांच्या पथकाने केली.