ईराणी टोळीतील सराईत महिला गुन्हे शाखेकडून अटकेत

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरणाऱ्या इराणी टोळीतील सराईत महिलेला गुन्हे शाखा युनिट २ ने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेवर राज्यात आणि राज्याबाहेरील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच या महिलेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्यात ती फरार होती. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ ने पाटील इस्टेट परिसरात केली.

फिजा सरफराज जाफरी उर्फ इराणी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. भिवंडी, कल्याण, ठाणे भागात ज्येष्ठ महिलांचे मंगळसुत्र चोरणारी महिला दापोडी येथे आली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथक दापोडी येथे पोहचले असता ही महिला पुण्याच्या दिशेने रिक्षात बसून गेली असल्याची माहिती पोलीस हवालदार शिवानंद स्वामी यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करून महिलेला पाटील इस्टेट परिसरात रिक्षातून उतरताना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान या महिलेवर मानपाडा, ठाणे, डोंबीवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तिच्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली या गुन्ह्यात ती दीड वर्षापासून फरार असल्याचे समोर आले. फिजा जाफरी या महिलेवर अंबाझरी, नागपुर, कल्याण, भिवंडी, ठाणे तसेच राज्याबाहेरील इंदोर, भोपाळ, डेहराडून येथे गुन्हे दाखल आहेत. फिजा जाफरीवर विविध राज्यांमध्ये १७ गुन्हे दाखल असून तिला अत्तापर्यंत १५ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. महिलेला कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहायक पोलीस फौजदार दिलीप चौधरी, संजय पंदरे, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, वसंत खोमणे पोलीस नाईक विपुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कापसे, मुंडे, कुडके, सानप, राऊत, हिवाळे यांच्या पथकाने केली.

You might also like