Corona Virus : इराणमध्ये कोरोनाचा हाहाकार ! खासदाराचा झाला मृत्यू, आरोग्य मंत्र्याला लागण

तेहरान : वृत्तसंस्था – चीननंतर आता इराणमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू झाला आहे. येथे कोरोना व्हायरसने होणार्‍या मृत्यूंचा आकडा लागोपाठ वाढत चालला आहे. या आजाराची लागण झालेल्या इराणच्या एका खासदाराचा शनिवारी मृत्यू झाला. मृत मोहम्मद अली रमजानी दस्तक हे मागच्या आठवड्यातच खासदार म्हणून निवडूण आले होते आणि काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. डेप्युटी हेल्थ मिनिस्टर ईराज हरीरची यांनाही कोरानाची लागण झाली आहे. इराणवर कोरोना व्हायरसशी संबंधीत बातम्या लपवण्याचा आरोपही केला जात आहे.

खासदार मोहम्मद अली रमजानी यांना शनिवारी सकाळी रूग्णालयात नेण्यात आले होते, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, इराणमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढू लागल्याने देशातील नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार- आतापर्यंत इराणमध्ये 43 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 593 लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, या आकड्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे आकडे दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले जात आहे.

बीबीसीला इराणच्या आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून माहिती मिळाली की, या आजाराने किमान 210 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, इराणच्या आरोग्य प्रवक्त्याने बीबीसी फारसीवर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. तर, अमेरिकेने यापूर्वीच इराणवर आरोप केला आहे की, इराण बहुतेक कोरोना व्हायरसबाबतची माहिती लपवत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 2700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.