Coronavirus : इराणमधील सर्वात मोठ्या धार्मिक नेत्यांमधील एक आयतुल्ला हाशीम बाथेई यांचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

तेहरान : वृत्तसंस्था – इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करणार्‍या प्रमुख धार्मिक संघटनेच्या 78 वर्षीय सदस्याचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. इराणची वृत्तसंस्था फार्स आणि तस्नीम यांच्या रिपोर्टनुसार मजिलसे खबरगाने रहबरीचे सदस्य आयतुल्ला हाशीम बाथेई यांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. या संस्थेला देशाच्या प्रमुख नेत्याची निवड करण्याचा अधिकार आहे. हाच नेता देशाच्या सर्व महत्वाच्या धोरणांवर अंतिम निर्णय घेत असतो.

वृत्तसंस्थांनी सोमवारी सांगितले की, इराणच्या अनेक प्रमुख अधिकार्‍यांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे, ज्यापैकी अनेकांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. इराणमध्ये मागील 24 तासात कोरोना व्हायरसमुळे आणखी 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांची संख्या वाढून 853 झाली आहे. येथे 14000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

इराणने अमेरिकेवर केले आरोप
रविवारी इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांनी इराणमध्ये कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंना अमेरिकेच्या आर्थिक प्रतिबंधांना कारणीभूत धरले आहे. जावेद म्हणाले, राष्ट्रपती हसन रूहानी यांनी जगभरातील आपल्या समतुल्य नेत्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, इराण कोरोनाशी लढत आहे, पण अमेरिकेने लावलेल्या आर्थिक प्रतिबंधामुळे या मोहिमेत सतत अडचणी येत आहेत. हे अमानुष आहे. कुणाच्या तरी दडपशाहीमुळे निर्दोष लोकांचे जीव जात आहेत. या व्हायरसला राजकारण आणि भूगोल समजत नाही. अशावेळी कुणीही त्यादृष्टीने पाहू नये.

सरकारी वृत्तसंस्था इराणने या महामारीविरूद्ध सुरू असलेल्या अभियानाचे नेतृत्व करणार्‍या अली रेजा जली यांचा संदर्भ देऊन म्हटले की, जर अशीच प्रवृत्ती पुढे राहिली तर साधनांची कमतरता भासणार आहे. इराणमध्ये जवळपास 110,000 हॉस्पिटल बेड आहेत, ज्यापैकी 30,000 तर राजधानी तेहरानमध्ये आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये 55 टक्के लोक 60 वर्षांच्या जवळपासचे होते, तर 15 टक्के लोकांचे वय 40 वर्षाच्या जवळपास होते.