रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! होळी निमित्त पुणे – पटणा स्पेशल ट्रेन, वेळापत्रक जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : होळीच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे स्थानकांवर वाढणारी गर्दी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते पटना, गांधीधाम ते भागलपूर सोबतच अनेक शहरांदरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. ५ मार्चपासून पुणे ते पटना दरम्यान होळी विशेष गाड्या सुरू होतील. जर आपल्याला आरक्षण मिळत नसेल तर या गाड्या एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

रेल्वे क्रमांक ०३२५३ गुरुवारी ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता पाटण्याहून सुटेल, जी दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी ६.२० वाजता पुण्याला पोहोचेल. त्याचबरोबर ट्रेन क्रमांक ०३२५४ ही पुण्याहून शुक्रवारी ८ मार्च रोजी रात्री ८.४५ वाजता सुटेल जी तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी ७ वाजता पाटना येथे पोहोचेल. याच वेळापत्रकानुसार या गाड्या १२ मार्च आणि १३ मार्च रोजी धावतील. या गाड्या अहमदनगर, बेलापूर, खांडवा, सतना, माणिकपूरसह अनेक स्थानकांवर थांबतील. होळी विशेष ट्रेन क्रमांक ०३२५४ साठी, २० फेब्रुवारी २०२० पासून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करता येईल.

याशिवाय उत्तर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेनेही अनेक होळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेची होळी विशेष ट्रेन गांधीधाम ते भागलपूर दरम्यान धावेल. पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, गांधीनगर-भागलपूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी ६ मार्चपासून सुरू होईल, जी अहमदाबाद, नांदेड, भवानी, कोटा यासह अनेक स्थानकांवर थांबेल. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.