खुशखबर ! ‘या’ ट्रेनच्या प्रवाशांना IRCTC देणार 25 लाखांचा मोफत विमा, या असतील VIP सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेच्या भारतातील पहिली खासगी ट्रेन मानल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) तेजस ट्रेन प्रवाशांना विमा सुविधा देणार आहे. या प्रवाश्यांचा २५ लाखांचा प्रवास विमा असेल. दरम्यान, पहिली तेजस ट्रेन ४ ऑक्टोबरला लखनऊ ते दिल्ली अशी धावणार आहे.

चोरी किंवा दरोडेखोरीपासून १ लाखांचे संरक्षण :

अधिकाधिक प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी आणि तिकिटांची बुकिंग वाढवण्यासाठी आयआरसीटीसी तेजस एक्स्प्रेस प्रत्येक प्रवाशाला २५ लाख रुपयांचा प्रवास विमा मोफत प्रदान करेल. ट्रॅव्हल इन्शुरन्स चोरी किंवा दरोडे अशा घटना घडल्यावर सामानावर १ लाख रुपयांचे कव्हर प्रदान करते.

ट्रेनला उशीर झाल्यास नुकसान भरपाई मिळणार :

याशिवाय तेजस एक्स्प्रेस उशीर झाल्यास प्रवाशांना अंशत: परतावा म्हणजे अर्धवट परतावा देण्यात येईल. जर ट्रेन १ तासापेक्षा अधिक उशीर करत असेल तर प्रवाशांना १०० रुपये तर दोन तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास २५० रुपयांचा परतावा देण्यात दिला जाईल.

परतावा मिळवण्यासाठी आयआरसीटीसी ई-वॉलेट किंवा पुढील ट्रेनच्या तिकिटावर सवलत देण्याच्या पर्यायावर कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेजसला भारताची पहिली खासगी ट्रेन म्हटले जात आहे, कारण भारतीय रेल्वेचे कॅटरिंग आणि पर्यटन युनिट या ट्रेनच्या कारभारावर देखरेख करत आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर सरकार भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये खासगी ऑपरेटरला संधी देऊ शकेल.

हे आहे ट्रेनचे वेळापत्रक :

लखनौहून दिल्लीकडे जाणारी तेजस एक्सप्रेस , जिचा नंबर ८२५०१ असा आहे, दररोज सकाळी ६:१० वाजता (मंगळवारी धावणार नाही) लखनऊ एनई स्टेशन वरून नवी दिल्लीकडे रवाना होईल. ही ट्रेन दिल्लीला दुपारी १२:२५ ला पोहोचेल. त्याच दिवशी तेजस क्रमांक ८२५०२ दिल्लीहून दिवशी दुपारी ३:३५ वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून सुटेल, जी रात्री १०:०५ वाजता लखनऊला पोहोचेल.

मिळणार या व्हीआयपी सुविधा :

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रथमच व्हीआयपी सुविधा उपलब्ध असतील. आता या व्हीआयपी ट्रेन ने प्रवास करणारे लोक हॉटेल बुकिंग, टॅक्सी आणि बॅगेज पिकअप अँड ड्रॉपचा लाभ घेण्यास सक्षम असतील. ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांचे सामान बोगीपर्यंत नेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याचबरोबर डेस्टिनेशन स्टेशनवर पोहोचल्यावर वस्तू पोचविण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे. एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाताना तुम्हाला मिठाई हवी असेल तर ती सीटवरच तुम्हाला मिळेल. मात्र यासाठी वेबसाइटवर तिकिट बुक करताना सुविधेची निवड करावी लागेल. यासाठी आयआरसीटीसी वेगळे शुल्क आकारेल.

Visit : policenama.com