ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी IRCTC ची खास ऑफर, विमान प्रवासावर 50 लाखांचा विमा मोफत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. बर्‍याच राज्यांमध्ये आंशिक लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी लोकांचा प्रवास कमी झाला आहे. दरम्यान अशावेळी सर्वाधिक सुरक्षित ट्रान्सपोटेशन साधन म्हणून विमान प्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. विमान कंपन्याही प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत आहेत. यातच आयआरसीटीसीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. आयआरसीटीसीच्या प्लॅटफॉर्मवरून विमान तिकिट बुकींग केल्यास कंपनीकडून आपल्याला 50 लाखांचा प्रवास विमा विनाशुल्क मिळणार आहे. तसेच कंपनी ग्राहकांना अनेक जागतिक दर्जाचे फायदेही देत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससोबत प्रत्येक श्रेणीतील तिकिटे घेणार्‍या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकिट बुक करण्यासाठी सुविधा शुल्क केवळ 50 रुपये आकारले जाणार आहे. ग्राहकांना 50 हून अधिक पेमेंट मोडमधून ट्रॅव्हल फेअर पेमेंटची सुविधा मिळत आहे. याशिवाय तिकीट बुक करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डिफेंस पर्सनलसाठी स्पेशल प्रवासी भाड्याची सुद्धा ऑफर कंपनीद्वारे दिली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या ग्राहकांना एकत्र विविध शहरांसाठी तिकिट बुकिंग, क्रेडिट शेल, सुपर सेव्हर, री-शेड्यूलिंग आणि सहज परतावा यासारख्या सुविधा देत आहे. तसेच, एलटीसी तिकिटांचे बुकिंगदेखील त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सहज केले जाऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.