महागाईला सुरुवात ? इंधन दरवाढीनंतर आता वाहन विम्याच्या दरात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहन अपघातात महत्त्वाचा ठरणारा थर्ड पार्टी इन्शुरन्स आता महागणार आहे. भारतीय नियामक आणि विकास प्राधिकरणा(IRDA)नं कार आणि दुचाकी वाहनांवरचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे. दरवर्षी १ एप्रिलला इन्शुरन्सचे प्रीमियम दर वाढविले जातात मात्र या वर्षी अद्याप मागील वर्षीचे दरच कायम ठेवण्यात आले होते. याबाबत आयआरडीए २९ मे पर्यंत तज्ज्ञांची मते जाणून घेईल व साधारणपणे १ जून पासून हे नवे दर लागू कारण्यात येतील.

असे असतील वाढलेले प्रीमियम दर –

चारचाकी वाहनांसाठी –
१००० सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या चार चाकी वाहनांच्या प्रीमियम मध्ये १४. ५ टक्के वाढ करण्यात येणार आहे ज्यामुळे अगोदर १,८५० रुपये किमतीच्या प्रीमियमसाठी आता २१२० रुपये भरावे लागणार आहेत. तर १००० ते १५०० सीसी इतकी कार्यक्षमता असणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी ३३०० किमतीचा प्रीमियम भरावा लागणार आहे यापूर्वी हा दर २८६३ इतका होता. मात्र १५०० सीसीपेक्षा अधिक कार्यक्षमता असणाऱ्या गाड्यांचा प्रीमियम पूर्वीचाच म्हणजे ७८९० इतकाच ठेवण्यात आला आहे. स्कूल बसचा प्रीमियम वाढू शकतो. टॅक्सी, बस आणि ट्रकसाठी प्रीमियम दर वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसाच तो ट्रॅक्टरचाही वाढेल.

दुचाकी वाहनांसाठी –
या तुलनेने दुचाकी वाहनाच्या प्रीमियमची दरातअधिक वाढ करण्यात आलेली नाही. यापुढे ७५ सीसी इतकी कार्यक्षमता असलेल्या दुचाकींसाठी अगोदर असलेल्या ४२७ रुपये किमतीच्या ऐवजी ५८५ रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे तर ३५० सीसी पेक्षा अधिक कार्यक्षम दुचाकींसातिच्या प्रीमियम मध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळेल १५ टक्के सूट –
IRDA ने इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक दोन चाकी वाहनांसाठी मोटर थर्ड पार्टी प्रीमियम दर १५ टक्के डिस्काउंट द्यायचा प्रस्ताव मांडलाय. ई रिक्षासाठी थर्ड पार्टी दर वाढणार नाही.

थर्ड पार्टी इन्शुरन्स ? –
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधित आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.