फायद्याची गोष्ट ! IRDAI देतंय 30 हजार रूपये कमाई करण्याची सुवर्णसंधी, फक्त करावं लागेल ‘हे’ सोपं काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (आयआरडीएआय) तीन विमा उत्पादनांच्या नावासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. नियामकने असेही म्हटले की, ज्यांच्या सुचवलेल्या नावाला मान्यता दिली जाईल त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि आयआरडीएआयच्या अध्यक्षांकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. याचा अर्थ असा की, जर तुम्ही सुचवलेल्या नावांपैकी एखाद्या नावाला आयआरडीएआयने मंजुरी दिली, तर तुम्ही घरबसल्या १०,००० रुपये जिंकू शकता. तुम्ही सुचवलेली दोन नावे मंजूर झाल्यास २०,००० रुपये मिळू शकतात. तसेच तुम्ही पाठवलेली तीनही नावे उत्पादनांसाठी निवडल्यास, तुम्ही ३०,००० रुपये मिळवू शकता.

कोणत्या योजनांसाठी पाठवू शकता नाव
आयआरडीएआयने आपल्या संकेतस्थळावर नोटीस जाहीर करत सांगितले आहे की, कार्यरत गटाच्या शिफारशींच्या आधारे ‘स्टँडर्ड फायर अँड स्पेशल पेरिल्स’ श्रेणीत तीन प्रमाणित उत्पादने प्रस्तावित आहेत. यामध्ये गृहनिर्माण, सूक्ष्म-व्यावसायिक युनिट्स आणि लहान व्यावसायिक घटकांना व्यापणारी पॉलिसीज समाविष्ट आहेत. या उत्पादनांसाठी तुम्ही १० जुलै २०२० पर्यंत [email protected] वर नावे पाठवू शकता.

सुचवावी लागेल सोपी आणि प्रासंगिक नावे
आयआरडीएआयने नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, नावे सुचवताना हे लक्षात घेतले पाहिजे की उत्पादनाचे नाव सोपे, प्रासंगिक आणि लक्षात ठेवण्यासारखे सुलभ असावे. तसेच ते नाव देशभर वापरले जाऊ शकेल. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, नाव असे असावे की उत्पादनाबाबत माहिती मिळेल.