नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना वाहनाची किंमत आणि विमा प्रीमियम वेगवेगळे भरण्याचा मिळू शकतो पर्याय

नवी दिल्ली : नवीन वाहन खरेदी करणार्‍यांना वाहनाची किंमत आणि विमा प्रीमियम वेगवेगळ्या चेकद्वारे भरण्याचा पर्याय मिळू शकतो. विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकारणाच्या (इरडा) एका समितीने वाहन विमा सेवा प्रदाता (एमआयएसपी) शी संबंधीत मार्गदर्शकतत्वांचे पुनरावलोकन करत हा सल्ला दिला. इरडाने वाहन विमा प्रक्रिया सोपी करण्यासाठी 2017 मध्ये एमआयएसपी मार्गदर्शकतत्व जारी केली होती. याचा हेतू वाहन डिलर्सद्वारे विकल्या जाणार्‍या इन्श्युरंसला विमा कायदा -1938 च्या तरतुदींच्या अंतर्गत आणायचे होते.

विमा कंपनी किंवा एखाद्या इन्श्युरंस इंटरमीडियरीद्वारे नियुक्त वाहन डिलरला एमआयएसपी म्हटले जाते, जे आपल्या माध्यमातून विकल्या जाणार्‍या वाहनांसाठी इन्श्युरंस करून देतात. नियंत्रकाने 2019 मध्ये एमआयएसपीशी संबंधीत मार्गदर्शकतत्वांच्या पुनरावलोकनासाठी एक समिती स्थापन केली होती. समितीने एमआयएसपीद्वारे मोटर विमा व्यवसायाचे व्यवस्थित पद्धतीने संचालन करण्यासाठी आपल्या रिपोर्टमध्ये अनेक शिफारसी केल्या आहेत.

समितीने अन्य मुद्द्यांसह मोटर वाहन विमा पॉलिसी करताना प्रीमियम भरण्याच्या सध्याच्या पद्धतीचे सुद्धा पुनरावलोकन केले. समितीने म्हटले की, सध्याच्या प्रणालीत ऑटो डिलरकडून पहिल्यांदा वाहन खरेदी करतेवेळी विमा प्रीमियमबाबत पारदर्शकतेचा अभाव आहे. यामध्ये ग्राहक एकाच चेकने पैसे भरतो. एमआयएसपी आपल्या खात्यातून विमा कंपनीचे पैसे भरते, अशावेळी ग्राहकाला हे समजत नाही की, त्याने किती प्रीमियम दिला आहे.

समितीने म्हटले की, पारदर्शकतेचा अभाव पॉलिसीधारकाच्या हिताचा नाही. सोबतच ग्राहकांना कव्हरेजचे पर्याय आणि सवलत याबाबत सुद्धा माहिती मिळत नाही. पारदर्शकता नसल्याने ग्राहकांकडे योग्य किंमतीत जास्त आणि चांगल्या कव्हरेजसाठी एमआयएसपीशी भाव करण्याचा सुद्धा पर्याय राहात नाही. एका रिपोर्टनुसार, एकुण मोटर इन्श्युरंसमध्ये एमआयएसपीद्वारे होणार्‍या इन्श्युरंसची भागीदारी 25 टक्केच्या जवळ आहे. एकुण जनरल इन्श्युरंसच्या व्यवसायाच्या तुलनेत सुमारे 11.25 टक्के आहे.