मुंबईत दोन ठिकाणी भीषण आग

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत लॉकडाऊनमुळे झालेले नुकसानामध्ये आणखी एका संकटाची भर पडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात नंदधाम उद्योग इथल्या मेट्रो लॅबोरेटरी कारखान्यात आग लागली होती. तर दुसरी आग दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट इथे लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.

मरोळमधील मेट्रो लॅबोरेटरी कारखान्याला लागलेल्या आगीत सामान जळून खाक झाले आहे. आग भडकली तेव्हा दोन कामगार या कारखान्यात असल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन केले. 5 फायर इंजिन,1 फोम टँकर,7 जम्बो टँकरच्या मदतीने सुमारे 4 तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.

नरीमन पॉइंट येथील जमनालाल बजाज रोड जोली मेकर चेंबरमधील बँक ऑफ बहरीन आणि कुवैतच्या सर्व्हर रूमला आग लागली होती. ही आग पहाटेच्या सुमारास लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कॉम्प्युटरसह काही कागदपत्र, फाईल्स जळून खाक झाल्या तर वातानुकूलित यंत्र सुद्धा जळाल्याने नुकसान झाले आहे. मुंबईत लागलेल्या या दोन्ही आगींमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळाली आहे.