अभिमानास्पद ! ‘या’ देशाचे मराठी पंतप्रधान ‘कोरोना’च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी बनले ‘डॉक्टर’

 पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र आयर्लंडचे पंतप्रधान आणि मूळ मराठी वंशाचे असणारे लिओ वराडकर यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी लिओ वराडकर पुन्हा एकदा डॉक्टर झाले आहेत.

आयर्लंडमधील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तिथे कोरोनाबाधितांची संख्या 5 हजारांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर लिओ वराडकर यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पेशात रजिस्ट्रेशन केले आहे. वराडकर हे पुढील एक आठवडा कोरोनाग्रस्तांचे उपचार करणार आहेत. सध्या आयर्लंडचे पंतप्रधान असलेल्या लिओ वराडकर यांनी 7 वर्ष डॉक्टर म्हणून काम केले आहे. राजकारणात येण्याआधी ते डबलिन येथील सेंट जेम्स रुग्णालय आणि कोनोली रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे. 2017 मध्ये ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तत्पुर्वी लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक होउन आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केले होते. लिओ यांचा जन्म हा आयर्लंडचा असला तरी त्यांचे मुळगाव हे वराड आहे. वराडकर यांनी आयर्लंड वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवले आहे. 2017 मध्ये ते सिमोन केव्हीने यांना पराभूत करून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.