मग क्रिकेटपटूंना क्वारंटाइन कशाला करायचे ? इरफान पठाणचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन महिने ठप्प असलेले क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी आयसीसीकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. क्रिकेटचा सराव सुरू करणे आणि क्रिकेट सामने खेळवणे अशा दोन्ही बाबींसाठी मिळून सर्व सदस्यांसाठी काही महत्वाचे नियम तयार केले आहेत. या नियमामध्ये क्रिकेट मालिका सुरु होण्याआधी 14 दिवस कोणत्याही क्रिकेट संघाला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या नियमावरून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने सवाल केला आहे.

सोशल डिन्स्टन्सिंग वैयक्तिक खेळांमध्ये शक्य आहे, पण क्रिकेट किंवा फुटबॉलसारख्या सांघिक खेळांमध्ये हा नियम शक्य नाही. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला विकेट किपरच्या बाजूला स्लीपचा फिल्डर हवा असेल, तर तुम्ही तो फिल्डर ठेवणार नाही का? त्याचसोबत प्रत्येक संघातील खेळाडूंना 14 दिवसांचा क्वारंटाइन काळ असेल असा नियम आहे. त्यात कोणी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला, तर त्याला क्रिकेटपासून दूर ठेवले जाईल. पण क्वारंटाइननंतर केवळ तंदुरूस्त खेळाडूच मैदानात उतरणार आहेत. अशा वेळी जर मैदानावरही नियम ठेवण्यात येत असतील, तर क्वारंटाइन कालावधीचा काय उपयोग? असा सवाल इरफान पठाणने उपस्थित केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे यात वादच नाही, पण त्याचसोबत खेळदेखील फार क्लिष्ट करून ठेवता कामा नये. प्रत्येक वेळी जर खेळाडूला चेंडूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ करावे लागणार असतील, तर क्रिकेट खेळणे खूपच कठीण होऊन बसेल असेही मत त्याने व्यक्त केले.

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार संघ व्यवस्थापनात प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करावी लागणार आहे. खेळाडूंच्या सरावाची जागा आणि ड्रेसिंग रूम स्वच्छ (सॅनिटाइझ) ठेवावी लागणार असून सरकारी परवानगी शिवाय सामने खेळवता येणार नाहीत.सोशल डिस्टन्सिंगचा महत्वाचा नियम पाळण्यासाठी खेळाडूंची टोपी, गॉगल, टॉवेल, जर्सी पंच सांभाळू शकणार नाहीत. पंचांना स्वतंत्र ग्लोव्ह्ज देण्यात येणार आहेत. तसेच, चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर न करण्यासाठी खउउ च्या समितीने या आधीच शिफारस केली आहे.