…म्हणून इरफानला भारतासाठी खेळायचे होते क्रिकेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमध्ये अनोख्या अभिनय शैलीने रुपेरी पडदा व्यापून टाकणार्‍या इरफान खानने आज एक्झिट घेतली. वयाच्या 54 व्या वर्षी त्याचे निधन झाले. इरफान आपल्या अफलातून अभिनयासाठी ओळखला जात होता.

परंतु लहान असताना त्याला अभिनेता नव्हे तर क्रिकेटर होण्याची इच्छा होती. नरेंद्र सैनी यांना दिलेल्या मुलाखतीत इरफानने ही इच्छा व्यक्त करुन दाखवली होती.

जर तू अभिनेता नसतास तर कुठल्या क्षेत्रात करिअर केले असते. असा प्रश्न नरेंद्र सैनी यांनी विचारला होता. या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता इरफानने क्रिकेट हे उत्तर दिले होते. खरं तर मला क्रिकेट आणि पतंग उडवण्याची खुप आवड होती. अनेकदा शाळा चुकवून मी क्रिकेट खेळायला धावायचो. लहानपणी मी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याची स्वप्न पाहायचो. परंतु क्रिकेट हा खूपच महागडा खेळ होता. त्यासाठी बॅट आणि बॉलसह संपूर्ण किट खरेदी करावे लागणार होते. शिवाय प्रशिक्षणासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे आर्थिक कारणांमुळे क्रिकेटची हौस मी मर्यादीत ठेवली. आणि अभिनयाच्या दिशेने वळलो. असे इरफानने मुलाखतीत सांगितले होते. इरफान खान भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.