अधुराच राहिला इरफान खानचा अखेरचा सिनेमा ! आता ‘हा’ अभिनेता घेणार त्याची जागा

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता इरफान खाननं दि 29 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. इरफान खाननं मागे खूप आठवणी सोडल्या आहेत. यापैकीच एक आहे त्याचा सिनेमा. अशी माहिती आहे की, एका सिनेमावर इरफानला डोळ्यासमोर ठेवून काम सुरू होतं ज्याची स्क्रिप्ट लिहिली जात होती. परंतु अचानक इरफानचं निधन झालं. असं समजत आहे की, आता इरफान ऐवजी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्याला घेऊन सिनेमा पूर्ण केला जाणार आहे. परंतु त्या अभिनेत्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तुम्बाडचे डायरेक्टर आनंद गांधी इरफानसाठी एक सिनेमा लिहित होते ज्यावर 5 वर्षांपासून काम सुरू होते. कोरोनाच्या सारख्या महामारीमुळं निर्माण झालेल्या स्थितीवर आधारीत हा सिनेमा आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, आनंद गांधीच्या या सिनेमाचं नाव इमरजेंसी ठेवण्यात आलं आहे. आनंद यांनी सांगितलं की, आता इरफाननंतर ते या सिनेमासाठी सुशांत सिंह राजपूतला घेणार आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियन अॅक्टर ह्युगो विविंग याला कास्ट करण्याची त्यांची इच्छा आहे.

आनंद यांनी सांगितलं की, “माझी मनापासून इच्छा होती की, या सिनेमात इरफान खान असावेत. परंतु ते आता आपल्यात नाहीत. सुशांत माझे चांगले मित्र आहेत. मला वाटतं की, ते माझ्यासोबत काम करतील. सिनेमातील महत्त्वाच्या भूमिका आणि अॅक्ट्रेस फायनल करणं अद्याप बाकी आहे.”