सिंचन घोटाळा : अजित पवारांना सध्या ‘क्लीनचीट’ पण ‘टांगती’ तलवार कायम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाची शपथ घेऊन 48 तास पुर्ण झाल्यानंतर अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंचन घोटाळयाशी संबंधित असलेल्या 9 प्रकरणामध्ये नस्तीबंदचे आदेश दिले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काढलेल्या आदेशात कुठेही अजित पवारांचे नाव नाही. मात्र, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा येथील एकुण 9 प्रकरणाच्या उघड चौकशी तसेच निविदा प्रकरणांची नस्तीबंद करण्याचे आदेश अप्पर पोलिस महासंचालक (अ‍ॅन्ट करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य) बिपिन कुमार सिंह यांनी अमरावती विभागाच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पोलीस अधीक्षकांना दि. 25 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आजच दिले आहेत. दरम्यान, या आदेशामध्ये आगामी काळात सरकार अथवा न्यायालयाने आदेश दिल्यास प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

याचाच अर्थ आगामी काळात सरकारच्या मनात आल्यानंतर पुन्हा एकदा सिंचन घोटाळयाशी संबंधित असलेल्या या 9 प्रकरणाची चौकशी सुरू होऊ शकते. त्यामुळे आता अजित पवारांना अटी व शर्थीवर सिंचन घोटाळयामध्ये क्लीनचीट देण्यात आली आहे अशी चर्चा चालु आहे. आगामी काळात सिंचन घोटाळयाची कधीही चौकशी सुरू होऊ शकते. त्यामुळे अजित पवारांवर घोटाळयाच्या चौकशीची टांगती तलवार असणार आहे.

Visit : Policenama.com