नांदेडच्या उमेदवारीबाबत काँग्रेसला वाटते ‘ही’ भीती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी बद्दल काँग्रेस अत्यंत गंभीर विचार करते आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विद्यमान खासदार असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, तर त्याचा चुकीचा संदेश जनतेत जाऊ शकतो, असे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सध्या वाटू लागले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नांदेड मधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे.

नांदेड लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवारीवर अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नीला उभा करण्याचा निर्णय घेतला होता. अशोक चव्हाण यांनी अमित चव्हाण यांना लोकसभेच्या निवडणुकीला उभे करावे आणि स्वतः विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याने अशोक चव्हाण त्यांच्या आग्रहाला अंमलात आणण्याच्या तयारीत होते.  मात्र आता त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडून मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान डॉ. सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुजय विखे पाटील यांचा प्रश्न व्यवस्थित हाताळला असता तर त्यांना पक्षांतर करण्याची वेळ आली नसती, असे राहुल गांधी यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना म्हणले आहे.  राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात आज महाराष्ट्रातील जागावाटपावर महत्वाची बैठक पार पडली आहे. तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवारांमध्ये देखील जागावाटपावर चर्चा झाली आहे.