मकरसंक्रांतीला धोका पत्करून पतंग उडवणे योग्य आहे का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (ओंकार खेडेकर) –  मकरसंक्रांतीच्या दिवशी पुण्यात अनेक ठिकाणी युवक पहाटे पासूनच आपापल्या किंवा इतर उंच इमारतींच्या छतावर, पाण्याच्या टाक्यांवर आणि टॉवर्सवर पतंग उडविताना आढळून येत आहेत. यामध्ये 14 वर्षापेक्षा खालील युवकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वेळा पतंग उडविताना अनेक युवकांचे तोल जातात, मांजाचे फास बसतात, इलेक्ट्रिक शॉक लागतात व अनेक धक्कादायक प्रकार घडतात. अश्या प्रकारच्या असंख्य घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. मांज्याचे अपघात हे नायलॉन मांजामुळे अधिक होतात व त्यापेक्षा अधिक दुर्घटना या इमारती वरून तोल जाऊन खाली पडल्या मुळे होतात.

असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील तळजाई जवळच्या लोकवस्ती मध्ये घडला आहे. 10 आणि 12 वर्षाचे दोन मुले आपल्या घराच्या छतावर कोणतीही सावधगिरी न बाळगता पतंग उडविताना पहायला मिळाले. ते छतावरच्या अगदी छोट्याश्या जागेवर उभे राहून पतंग उडवत होते. त्यांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा नव्हती. याकडे पालकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. संक्रांतीच्या धोकादायकपणे पतंग उडविताना अनेक अपघात होतात.असे अपघात घडू नयेत यासाठी पालकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही.

कोरोना सारख्या महामारीतून वाचवलेले जीव, मकरसंक्रांतीच्या दिवशी एका शुल्लक निष्काळजीपणा मुळे घालवणे हि एक मुर्खपणाची गोष्ट आहे. पतंग उडवण्यासाठी धोका पत्करणे अयोग्य आहे का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सण साजरे करावेत मात्र आपल्यामुळे इतरांना किंवा स्वत:ला कोणताही धोका होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. छतावर किंवा मोठ्या इमारतींवर पतंग उडवत असताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.