पुणे अंमली पदार्थांचे केंद्र ? ; कस्टमकडून ३१ लाखांचा गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागील दोन दिवसांपासून शहरात अंमली पदार्थांचे मोठे साठे पकडले जात आहे. त्यामुळे पुणे अंमली पदार्थांचे केंद्रच बनतेय की काय अशी अवस्था झाली आहे. ९१ लाखांचे कोकेन पुणे पोलिसांनी जप्त केल्यानंतर कस्टमच्या नार्कोटीक्स सेलने आळे फाट्याजवळ गांजाचा मोठा साठा पकडला आहे. ३१ लाखांच्या १६५ किलो गांजासह दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील २२ लाखांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

अंकुश भिमराव पांडुळे (रा. आष्टी जि. बीड), नितीन पिराजी आंबेकर (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सीमा शुल्क विभागाच्या नार्कोस्टीक सेलच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी नगर-कल्याण महामार्गावर आळे फाट्या जवळील डोंबर वाडी टोलनाक्यावर एक इनोव्हा (एमएच ०५ डीक्यू १२१४) कार पकडली. त्यावेळी वाहनाची झडती घेतली असता सात प्लास्टीक पिशव्यांमध्ये एकूण १६५ किलो गांजा मिळून आला. पथकाने ३१ लाख किंमतीच्या गांजासह २२ लाखांची इनोव्हा कार जप्त केली.
पंचनामा करून दोघांनाही खेडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अशी माहिती कस्टमच्या सह आयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली आहे.