…त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला वाईट वाटते : सॅम पित्रोदा 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर देत बालाकोट येथे एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या तळे उद्ध्वस्त केली. या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात खरचं ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का ?, असा प्रश्न पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे. सॅम पित्रोदा हे गांधी कुटुंबांचे नकटवर्तीय म्हटले जातात. त्यामुळे पित्रोदांच्या वक्तव्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

भारताच्या या हवाई हल्ल्याबाबत मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरंच असा हल्ला केला का ? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले ? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असं पित्रोदा यांनी म्हटलं.

काही लोकांमुळे संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवता येणार नाही. तसंच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकवर केलेल्या कारवाईची पद्धतही चुकीची होती, असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी यावेळी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.

या पूर्वीही भारतावर पुलवामासारखे हल्ले झाले आहेत. मुंबईतही असाच हल्ला झाला होता. त्यावेळीही आपण कठोर भूमिका घेत आपली विमाने पाकिस्तानात घुसवली होती. मात्र, अशी प्रकरणे हाताळण्याचा हा योग्य दृष्टीकोन नाही. माझ्या मते जगाशी अशा पद्धतीने वाटाघाटी करणे चुकीचे आहे. तसंच मुंबई हल्ल्यावेळी आठ लोक इथे आले आणि त्यांनी हल्ला केला. मात्र, यामुळे तुम्ही पाकिस्तानातील सर्व नागरिकांना दोषी ठरवू शकत नाही, पण हीच गोष्ट आपण स्वीकारत नाही, असे मत पित्रोदा यांनी मांडले.

त्यानंतर पित्रोदा यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. मी फक्त नागरिक म्हणून माझे मत मांडले आहे. काय झाले हे जाणून घेण्यासाठी सामान्य नागरिक म्हणून मी पात्र आहे. मी पक्षाच्या वतीने बोलत नसून केवळ नागरिक म्हणून बोलत नाही. मला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, या काय चूकीचे आहे, असंही पित्रोदा यांनी म्हटलं आहे.