TV ची ‘शनाया’ ईशा केसकरला पितृशोक !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड असो वा मराठी फिल्म इंडस्ट्री, कोणतीही अभिनयाचाी पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या बळावर अभिनय क्षेत्रात येऊन आपलं स्थान निर्माण करणारे कलाकार खूप कमी आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ईशा केसकर (Isha Keskar). रंगमंचापासून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ईशा केसकरचं लहान पडद्यावर आणि मराठी सिनेमातही खूप नाव झालं आहे. अलीकडेच ईशाच्या वडिलांचं निधन झालं आहे. सोशलवर फोटो पोस्ट करत ईशानं याबद्दल माहिती दिली आहे.

ईशानं तिच्या इंस्टा स्टोरीला वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं त्यांची जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक यांचाही उल्लेख केला आहे. ईशाच्या वडिलांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून तिच्या वडिलांची तब्येत खराब होती. त्यांच्या जाण्यानं आता ईशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या ती कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही असं तिच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. ईशानं तिच्या वडिलांसोबत अनेकदा फोटोही पोस्ट केले होते.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती शनायाची भूमिका साकारत आहे, जी प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस आहे. 2013 साली आलेल्या वि आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातही तिनं काम केलं आहे. झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेमुळं ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची बानूची भूमिका सर्वांनाच आवडते.

You might also like