MS धोनीशी तुलना केल्यामुळे ऋषभ पंत अपयशी – एम.एस.के. प्रसाद

पोलिसनामा ऑनलाईन टीम- भारतीय संघाचा नवोदित खेळाडू ऋषभ पंतने स्वतःची तुलना
माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीशी केल्यामुळे तो अपयशी ठरत असल्याचे वक्तव्य तत्कालीन निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी केले आहे.

ऋषभ पंत मैदानात उतरायचा त्यावेळी त्याची तुलना धोनीसोबत होत होती. अनेकदा तो देखील यात ओढला गेला. आम्ही अनेकदा त्याच्याशी बोलायचो आणि त्याला सांगायचो की तुला यामधून बाहेर यायला हवे. धोनी हा संपूर्णपणे वेगळा खेळाडू आहे आणि तू वेगळा खेळाडू आहेस. तुझ्यातही तेवढी गुणवत्ता आहे म्हणून आम्ही तुला पाठींबा देतोय. संघ व्यवस्थापनातली लोक ही त्याला हे नेहमी सांगायची. परंतू तो नेहमी धोनीच्या छायेत वावरला.

नकळत त्यानेही स्वतःची तुलना धोनीशी करायला सुरुवात केली. यष्टीरक्षणातही त्याने धोनीची कॉपी करायला सुरुवात केली. यष्टींमागे सामन्यात पंत काय करत असतो हे तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला मी काय म्हणतोय हे लक्षात येईल. प्रसाद यांनी ऋषभ पंत अपयशी होण्यामागचे कारण सांगितले. सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे अखेरीस भारतीय संघाने टी-20 क्रिकेटमध्ये पंतला विश्रांती देऊन लोकेश राहुलला संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली. जर पंत यातून लवकर बाहेर आला नाही तर तो टी-20 संघातले स्थान गमावून बसेल अशी भीती प्रसाद यांनी व्यक्त केली.