IND Vs NZ : शिखर धवन पाठोपाठ आणखी एका खेळाडूची न्यूझीलंड दौऱ्यातून ‘माघार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंका (टी-20) आणि ऑस्ट्रेलियाला (वनडे) धूळ चारल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ 2020 च्या पहिल्या विदेश दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताने नव्या वर्षात श्रीलंकेविरोधात टी-20 सामन्यात 2-0 असा विजय मिळवा तर ऑस्ट्रेलियाविरोधी वन डे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळपट्टीवर आपला बोलबाला झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ तगड्या न्यूझीलंडशी सामना करणार आहे. परंतु तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवनने खांद्याच्या दुखापतीमुळे मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्यात आता आणखी एका खेळाडूने माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली होती. तर तिसऱ्या सामन्यात त्याने मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीला देखील आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे साशंकता होतीच की धवन न्यूझीलंडच्या दौऱ्यातून माघार घेईल. अखेर त्याने माघार घेतली. भारतीय संघासह धवन ऑकलंडला रवाना झाला नाही. त्यापाठोपाठ आता वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीकडून खेळणारा इशांत दुखापतग्रस्त झाला होता. डॉक्टरांच्या मदतीने त्याला मैदान सोडावे लागले होते. त्याच्या घोट्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो कसोटी मालिकेत सहभागी होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठीचा भारतीय संघ जाहीर केला आहे. त्यामुळे आता कसोटी सामन्याच्या मालिकेत कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा –