‘डॅरेन सॅमी’ला ‘इशांत शर्मा’नं म्हटलं होतं ‘काळू’, आता समोर येतायेत IPL मधील वर्णद्वेषाचे ठोस पुरावे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   डॅरेन सॅमीने जेव्हा आरोप केला होता की आयपीएलमध्ये त्याला ‘काळू’ म्हटले गेले आणि त्याचे सहकारी खेळाडू त्याला हसले तेव्हा बीसीसीआयसह बरेच माजी क्रिकेटपटू स्पष्टीकरण देण्यासाठी खाली आले होते. काहीजण असे म्हटले की स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांनी तसे केले असावे, परंतु आता सॅमीसाठी ही अपमानास्पद भाषा वापरणारे दुसरे कुणी नसून सनरायझर्स हैदराबादमधील त्याचेच सहकारी क्रिकेटपटू असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

वास्तविक, इन्स्टाग्रामवर केलेल्या खुलासादरम्यान सॅमीने कोणत्याही क्रिकेटपटूचे नाव घेतले नाही. पण आता भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची सुमारे सहा वर्ष जुनी एक पोस्ट व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये इशांतने लिहिले आहे की, ‘मी, भुवी, काळू आणि गन सनरायझर्स.’

https://www.instagram.com/p/n-9FXeGjXV/?utm_source=ig_web_copy_link

आता लोक सोशल मीडियावर ईशांत शर्माला ट्रोल करत आहेत. हा फोटो हटविण्यासाठी चाहते या जुन्या पोस्टवर कमेंट करीत आहेत. वेस्ट इंडिजकडून टी-20 विश्वचषक जिंकणारा कर्णधार डॅरेन सॅमीने 38 टेस्ट, 126 वन-डे आणि वन-डे टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर करत प्रत्येक त्या खेळाडूस मॅसेज करण्याचे म्हटले होते, ज्यांनी त्याच्यासाठी जातीय शब्दाचा वापर केला होता.

सॅमीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ जारी केला आहे, ‘मी जगभर खेळलो आहे. मला बर्‍याच लोकांकडून प्रेम मिळाले आहे. मी ज्या संघाकडून खेळलो आहे त्या संघाच्या ड्रेसिंग रूमकडून मला प्रेम मिळाले आहे. हे सर्व लोकांना लागू होत नाही. त्या एका शब्दाचा अर्थ शोधल्यानंतर मला खूप राग आला होता. मग मला आठवलं की एसआरएचसाठी खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे, जो शब्द कृष्णवर्णीय लोकांसाठी अपमानकारक शब्द म्हणून ओळखला जातो. जेव्हा मला असे म्हटले जायचे तेव्हा माझे सहकारी हसायचे’, असे त्याने स्पष्ट केले.

तसेच डॅरेन सॅमीने म्हटले की ‘मी त्या लोकांना मॅसेज करेन. आपण कोण आहात हे आपल्याला माहिती आहे का. मी त्यांना विचारेल की जेव्हा तुम्ही मला अशी वाईट हाक मारायचे तेव्हा तुमचा त्यामागील हेतू वाईट होता का? मला सर्व ड्रेसिंग रूम्स मधून खूप प्रेम मिळालं आहे. माझ्या बर्‍याच चांगल्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत, म्हणून जो कोणी मला हा शब्द घेऊन बोलावतो त्याने थोडा विचार करावा, यावर बोलूया, जर वाईट हेतूने असे म्हटले गेले तर मी खूप निराश होईल. जेव्हा मला या शब्दाने हाक दिली जायची तेव्हा मला असे वाटायचे की याचा अर्थ खंबीर मनुष्य किंवा असा काहीतरी असावा. मला त्या वेळी त्याचा अर्थ माहित नव्हता.’

डॅरेन सॅमीने खुलासा केला होता की, आयपीएलमध्ये त्याला आणि परेराला ‘काळू’ म्हणून संबोधले जात होते, आता त्यांना याबद्दल कळले आहे, त्यानंतर तो खूप चिडला आहे. सॅमीने म्हटले की, ‘मला नुकताच ‘काळू’ या नावाचा चा अर्थ कळला आहे. मला असं वाटायचे की याचा अर्थ मजबूत घोडा आहे, परंतु माझी आधीची पोस्ट याचा आणखी काही वेगळा अर्थ सांगत आहे त्यामुळे मला प्रचंड चीड आली आहे.’ मात्र या दरम्यान सॅमीने कुणाचेही नाव घेतले नाही.

हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचा नागरिक जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर उद्भवले आहे. पोलिस कोठडीत या कृष्णवर्णीय माणसाच्या मृत्यूनंतर जगभरात जातीय भेदभावविरूद्ध आवाज उठविला जात आहे. क्रिकेटपटू डॅरेन सॅमीपूर्वी ख्रिस गेलनेही वर्णभेदाचा बळी असल्याचे स्वत:चे वर्णन केले. बेसबॉल, टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल आणि जगातील प्रत्येक खेळाशी संबंधित खेळाडू संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत.