‘लॉकडाऊन’मध्ये ‘या’ माजी खासदाराच्या घरातच सुरू होती ‘इश्क दीवाना’ची शुटींग, MP सह निर्मात्या विरोधात FIR

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन लागू झाला आहे. सारं काही बंद आहे. जनताही काही अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू शकत नाहीये. अशात लॉकडाऊनमध्येच बिहारमध्ये सिनेमाची शुटींग सुरू होती. बिहारच्या सुपौलमध्ये सिनेमाची शुटींग केल्याप्रकरणी भाजपचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री आणि जेडीयुचे माजी खासदार विश्वमोहन कुमार यांच्या विरोधात पिपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार पिपरा भागातील कटैया गावातील आपल्या घरातच इश्क दीवाना या सिनेमाची शुटींग करत होते. याचवेळी एसएसपी मनोज कुमार यांनी कारवाई केली.

सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही माजी मंत्री आणि माजी खासदार विश्वमोहन कुमार यांनी आपल्याच भोजपुरी फिल्म निर्मात्याला घरी आमंत्रित केलं. यानंतर कटैया गावात सिनेमाची शुटींग सुरू होती. शेकडोंची गर्दी शुटींग पाहण्यासाठी जमू लागली. ही गर्दी म्हणजे कोरोनाच्या पार्वभूमीवर एक मोठा बेजबाबदारपणाच असल्याचं दर्शवत होतं.

बीडीओनं केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

स्थानिक लोकांनी तक्रार केल्यानंतर बीडीओ आणि पिपरा सीओ यांनी हे प्रकरण दाबलं होतं. परंतु एसएसपी मनोज कुमार यांनी स्वत: या प्रकरणाचा तपास करत माजी खासदार विश्वमोहन कुमार आणि इश्क दीवाना सिनेमाचे निर्माते यांच्या विरोधात पिपरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबद्दल बोलताना एसएसपी म्हणाले, “कंपनीचे सर्व कॅमेरेही जप्त करण्यात आले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकणातील आरोपींना अटक केली जाईल” असंही ते म्हणाले.