इशरत जहाँ बनावट चकमक : IPS अधिकारी सिंघल यांच्यासह 3 पोलीस अधिकारी दोषमुक्त, विशेष CBI न्यायालयाचा निकाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   2004 मधील इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात अहमदाबाद येथील CBI च्या विशेष न्यायालयाने बुधवारी (दि.31) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. बनावट चकमक प्रकरणातील आरोपी असलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांची CBI न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल, सेवानिवृत्त अधिकारी तरुण बारोट आणि अनाजु चौधरी अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पोलीस अधिका-यांची नावे आहेत.

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात जी.एल. सिंघल, बारोट आणि चौधरी या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप लावले होते. 20 मार्च रोजी पोलीस महानिरीक्षक सिंघल, निवृत्त पोलीस अधिकारी तरुण बारोट व चौधरी यांनी परवानगी न मिळाल्यामुळे न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्यासाठी’ न्यायालयात अर्ज दाखल केला होता. काही दिवसांपूर्वीच सिंघल यांच्यासह 3 आरोपी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खटला भरण्याची परवानगी गुजरात सरकारने नाकारल्याची CBI ने न्यायालयाला दिली होती. 2019 साली राज्य सरकारने अशाच प्रकारे परवानगी नाकारल्यामुळे विशेष CBI न्यायालयाने माजी प्रभारी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा आणि एन.के. अमीन यांच्याविरुद्धची कारवाई रद्द केली होती. त्यापूर्वी 2018 साली माजी प्रभारी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांनाही या खटल्यातून मुक्त केले होते.

दरम्यान 15 जून 2004 मध्ये इशरत, जावेद शेख उर्फ प्राणेश पिल्लई, अमजद अली अकबरअली राणा आणि जिशान जौहर यांना अहमदाबादजवळ एका चकमकीत ठार मारले गेले होते. ते त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी अहमदाबादेत गेले होते, असा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाने ही चकमक बनावट असल्याचे सांगत चौकशीचे आदेश दिले होते.