ISI च्या इशाऱ्यावर टार्गेट किलिंग करणारा सुख बिकारीवाल याला दुबईमध्ये घेतले ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी पंजाबमध्ये टार्गेट किलिंग करणारा गँगस्टर सुख बिकारीवाल याला दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. काल दिल्ली पोलिसांनी पाच आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर खुलासा केला की, सुख बिकरीवाल याने दुबईत बसून आयएसआयच्या सांगण्यावरून पंजाबमध्ये बलविंदर संधूची हत्या केली होती.

एका वृत्तसंस्थेकडे सुख बिकरीवाल याचे खास फोटो आहेत. दुबईत त्याची शैली बदलली आहे. त्याने पगडी बांधलेली आहे. दाढी वाढवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत पकडलेल्या आतंकवाद्यांचा खुलासा झाल्यानंतर भारतीय एजन्सींनी दुबईतील सुख बिकरीवाल याच्या फ्लॅटवर छापा टाकला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शकरपूर भागात चकमकीनंतर पाच आतंकवाद्यांना अटक केली. तीन आतंकवादी काश्मीरचे तर दोन पंजाबचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामिक आणि खलिस्तानी आतंकवादाचे हे नवीन कनेक्शन अत्यंत प्राणघातक आहे. त्यांचे मालक पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये बसले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आतंकवाद्यांना भारताविरुद्ध खलिस्तानी आंदोलनाला हवा देण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी दुबईमध्ये लपून बसलेला गुंड सुख बिकरीवाल आयएसआयचा मोहरा बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणजित नीटा पाकिस्तानमधील खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा सेल्फ स्टाइल डॉन आहे. रणजित नीटा याने बिकरीवालकडे टार्गेट किलिंगची जबाबदारी दिली होती.

असे म्हणतात की, आतंकविरुद्ध बलविंदरसिंगला ठार मारण्यासाठी दिल्लीत पकडलेल्या पंजाबच्या दोन्ही आतंकवाद्यांना सुख बिकरीवालने सुपारी दिली होती. म्हणजेच बलविंदरसिंग यांच्या हत्येचा कट पाकिस्तानकडून रचला गेला आहे, जेणेकरून येथील शांतता खराब होऊ शकेल.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले पाच आतंकवादी नार्को-आतंकवादाशी संबंधित होते, ज्याचा वापर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय करत होती. हे पाच आतंकवादी नार्को-टेररिझमच्या माध्यमातून मादक पदार्थांचा सौदादेखील करीत असत. हे पैसे आतंकवाद्यांना पाठवत असत आणि हे पैसे टार्गेट किलिंगमध्ये वापरत असत.