15 व्या वर्षी इंग्लंडमधून पळून जाऊन केलं ISIS च्या आतंकवाद्याशी लग्न, प्रेमानं ‘नर्कयातना’ भोगाव्या लागल्या आयुष्यात शमीमाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपले घर, आई – वडील यांना सोडून इस्मालिक स्टेट इन इराक अँड सीरियाच्या दशहतवाद्यांशी लग्न करणार्‍या मुलींसाठी आयुष्य एखाद्या नरकापेक्षा कमी नाही. ईसीसचा खात्मा झाल्यानंतर या मुली सीरियाच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये मुलांसह भयंकर यातनामय आयुष्य जगत आहेत. आता या मुलींना आपल्या देशात परतायचे आहे. परंतु, परतीचे सर्व दरवाजे बंद झाल्याचे दिसून येत आहे. शमीमा बेगम अशीच एक ईसीस वधू आहे, जी 2014 मध्ये अवघ्या 15 वर्षांच्या वयात ब्रिटनहून पळून जाऊन सीरियात पोहचली होती, परंतु आता तिला परत यायचे आहे. मात्र, आता हे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.

शमीमा ईस्ट लंडनच्या स्कूलमध्ये शिकत होती. आयुष्य खुप सुंदर होते, पैशाची कमतरता नव्हती आणि भरपूर सुखसुविधा होत्या. मात्र, अचानक डोक्यात बंडखोरीचे वारे घुमू लागले आणि शमीमा आपल्या तीन मैत्रिणींसह सीरियात पोहचली. छोट्या वयात ईसीसच्या सैतानी आयडियोलॉजीने डोक्यावर इतका परिणाम केला की, स्वर्गासारखे सुंदर आयुष्य नरकापेक्षाही वाईट झाले. ऐशोआरामात राहणारी शमीमा ईसीसच्या कॅम्पमध्ये पोहचल्यावर शमीमा बेगम बनली.

विचित्र वळणावर आयुष्य
आता 20 व्या वर्षी शमीमाचे आयुष्य एका विचित्र वळणावर येऊ थांबले आहे. शमीमाला मुलासह पुन्हा ब्रिटनचे नागरिकत्व हवे आहे, परंतु शुक्रवारी ती आपली कायदेशिर लढाई हारली आहे. ब्रिटेनच्या इमिग्रेशन कमिशनने तिचा अर्ज फेटाळला आहे. शमीमाची मागणी होती की, ती अन्य कोणत्याही देशाची नागरिक नाही, म्हणून तिला ब्रिटनचे नागरिकत्व देण्यात यावे. परंतु कमिशनने राष्ट्रहिताशी तडजोड करता येणार नाही, असे म्हणत शमीमाचा अर्ज फेटाळला.

मैत्रिणींसोबत पळाली सीरियामध्ये
2015 मध्ये ईसीसमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या तीन मैत्रिणींसह शमीमा लंडनच्या बेथनल ग्रीन येथून सीरीयात पळून आली. चार वर्षात तिचा शोध लागला नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये शमीमा सीरियाच्या एका निर्वासितांच्या शिबीरात सापडली. यावेळी तिने घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी तिच्या कुशीत एक नवजात बाळ होते.

कॅम्पमध्ये आणखी राहू शकत नाही
शमीमा बेगम, म्हणजेच ईसीसीच्या वधूने आपण भोगलेल्या यातना सांगितल्या. तिने म्हटले, मला वाटते की लोकांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे, कारण माझे सर्वस्व गेले आहे. मला माहिती नाही की माझ्या आयुष्यात काय होणार आहे. मला माझ्या मुलासाठी परतायचे आहे. मी या कॅम्पमध्ये आणखी राहू शकत नाही. माझ्यासाठी आता हे अशक्य आहे.

नागरिकत्व रद्द
ईसीस वधू बनलेल्या शमीमा बेगमची वेदनादायी कहानी फेब्रुवारी 2019 मध्ये जेव्हा जगाच्या समोर आली तेव्हा ब्रिटनमध्ये तिच्या नागरिकत्वावरून वादविवाद रंगले होते. परंतु, ब्रिटनचे तत्कालीन होम सेक्रेटरी साजिद जाविद यांनी शमीमाचे नागरिकत्व देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून रद्द केले. शमीमाने होम सेक्रेटरींच्या या निर्णयाला इमिग्रेशन अपील कमिशनमध्ये आव्हान दिले, परंतु शुक्रवारी शमीमाची उरली-सुरली आशीही मावळली.

तीनवेळा झाली आई
चार वर्ष ईसीस कॅम्पमध्ये शमीमा राहिली. या चार वर्षात ती तीनवेळी आई बनली. पहिल्या दोन मुलांचा जीव ती वाचवू शकली नाही, परंतु आपल्या तिसर्‍या नवजात मुलासह तिने मागच्या वर्षी ईसीस सोडण्याचा निर्णय घेतला. कारण, उशीरा का होईना तिला जाणीव झाली की, सैतानांच्या या किल्ल्यात तिचे आयुष्य बरबाद झाले आहेच, आता मुलाचेही आयुष्य बरबाद होऊ नये.

बाळासाठी सोडली दहशतवादी संघटना
शमीमाने सांगितले की, माझी सर्वात मोठी प्राथमिकता माझे मुल आहे. मुलासाठीच मी ईसीस सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्यापासून माझे मुल कुणी हिरावून घेऊ नये असे मला वाटत होते.

शमीमाला नागरिकत्व का दिले जात नाही ?
अनेक हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुद्धा शमीमाला ब्रिटन सोडून सीरियात जाण्याच्या निर्णयाबात पश्चाताप नाही. तिला वाटते की जे काही झाले त्यातून जीवनातील नवे अनुभव मिळाले.

मला माझा पती आवडतो
शमीमा बेगमने पुढे म्हटले की, एक माणून म्हणून ईसीसने मला बदलले. त्याने मला खुप मजबूत बनवले. मी माझ्या पतीला खुप पसंत करते. मुलांवर प्रेम करते. मी घालवलेला येथील कालावधी चांगला होता.

कोणताही पश्चाताप नाही
मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शमीमाने केलेले हे वक्तव्यच तिच्यासाठी अडचणी निर्माण करणारे ठरले आहे. नरक यातना भोगूनही ईसीसमध्ये सहभागी होण्याबाबत पश्चाताप नसल्याचे तिने म्हटले होते. सीरियात पोहचल्यानंतर शमीमाने इस्लामिक स्टेटचा डच दहशतवादी यागो रियेदीक बरोबर लग्न केले होते, ज्यानंतर तिला आयएसआयएस ब्राइड म्हणजे ईसीस वधू म्हणून जाहीर करण्यात आले होते.

तडफडत आहेत मुली
ईसीसच्या या भूमीत असंख्य शमीमा आहेत. अशा अनेक तरूणी तेथील कॅम्पमध्ये नरक यातना सहन करत आहेत. त्यांनी अगोदर स्वत: मार्ग निवडला. मात्र, नंतर त्यांना जबरदस्तीने बंदिस्त ठेवण्यात आले. उत्तर सीरियाच्या कुर्द शिबीरातील अशा शेकडो तरूणी या नरकातून बाहेर पडण्यासाठी तडफडत आहेत.