ISIS चा म्होरक्या अल-बगदादी अद्याप जिवंत ? व्हिडिओने खळबळ…

बगदाद : वृत्तसंस्था – ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी जिवंत असल्याचे वृत्त आले आहे. तब्बल पाच वर्षांनंतर एका व्हिडिओतून बगदादी जिवंत असल्याचे दिसून आले आहे. मात्र ‘आयसिस’ने जारी केलेला बगदादीचा हा व्हिडिओ नेमका कधी चित्रीत करण्यात आला आहे. अद्यापही स्पष्ट झाले नाही. २०१४ मध्ये बगदादी ठार झाला असल्याचे वृत्त होते.

२०१४ मध्ये ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी मोसुल शहरात शेवटचा दिसला होता. त्यानंतर मधल्या काळात तो मारला गेला, तो जखमी आहे, अशी अनेक वृत्ते झळकली होती. त्यामुळे बगदादीचे नेमके काय झाले?, हा प्रश्न अनुत्तरीत असताना बगदादीचा एक व्हिडिओ समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बगदादीचा हा व्हिडिओ ‘आयसिस’ने जारी केला आहे. त्यामध्ये सीरियातील ‘आयसिस’चा शेवटचा गड बागूजबाबत बगदादी बोलताना दिसत आहे. ‘बागूजची लढाई संपुष्टात आली आहे’, असे बगदादी अन्य तिघांना सांगत आहे. अन्य तिघांचे चेहरे ब्लर करण्यात आलेले आहेत. मात्र ‘आयसिस’ने जारी केलेला बगदादीचा हा व्हिडिओ नेमका कधी चित्रीत करण्यात आला आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

विशेष म्हणजे, ‘आयसिस’ने श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती. आणि आता या स्फोटांनंतर अवघ्या सातच दिवसांत बगदादी जिवंत असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ समोर आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.