‘दहशतवादी’ संघटना आयसिसवर कोरोनाची ‘दहशत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांनी आपल्या देशातील विमान सेवा बंद केली आहे तर काही देशांनी परदेशी नागरिकांना देशात प्रवेश नाकारला आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक उद्योग व्यवसायांवर परिणाम होत आहे. सामान्य लोकांमध्ये सध्या कोरोनाची दहशत पसरली आहे. एवढेच नाही तर सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसिसलाही कोरोनाची धास्ती आहे. या संघटनेने आपल्या अतिरेक्यांसाठी एक नियमावलीच जाहीर केली आहे.

आयसिस दहशवादी संघटनेचं वृतपत्र असलेल्या ‘अल-नाबा’मध्ये कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उपाययोजना दिल्या आहेत. यामध्ये आजारी व्यक्तीपासून दूर राहणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवणे, जेवणाआधी हात धुणे, कोरोनाची लागण असलेल्या युरोपमध्ये जाणं टाळणे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर अल्लाहवर विश्वास ठेवून त्याला शरण जाण्याचाही पर्याय सुचवण्यात आला आहे. कोरोनाची लागण ही अल्लाहच्या अवकृपेमुळे होत असल्याचंही वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे.

इराक आणि सिरीयामधील आयसिसचं वर्चस्व असलेल्या भागात अधिक जागता पहारा देण्याचे आदेशही अतिरेक्यांना देण्यात आले असल्याचे वृत्त आहे. इराकमध्ये आत्तापर्यंत 79 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.