खळबळजनक ! ISIS शी संबंधित दहशतवादी काश्मिरी जोडप्याचं पुणे ‘कनेक्शन’ आलं समोर

नवी दिल्ली : दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या मुळच्या काश्मिरी दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली होती. हे दोघेजण आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या दाम्पत्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समजत असून त्यांचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. हे दोघेजण आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत होते, असा पोलिसांचा संशय आहे.

पकडण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे जहनजेब सामी आणि हिना बशीर बेग अशी आहेत. हिनाचे उच्चशिक्षण पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतर तीने पुण्यात नामांकित पुण्यात कोटक आणि एव्हीएन अ‍ॅम्रो बँकेत नोकरी देखील केली आहे. त्यानंतर तीने मुंबईतील मोतीलाल ओसवाल सिक्युरिटी कंपनीतही काम केले होते.

हिनाचा पती सामी हादेखील उच्चशिक्षित असून तो काहीकाळ पुण्यातील स्पोक डिजिटल नावाच्या कंपनीत काम करत होता. त्याने पंजाबमधून बी.टेक केल्यानंतर त्याने बंगळुरूच्या इन्स्टिट्यूटमधून एमबीए पूर्ण केले आहे. एचपी कम्प्युटर या मोठ्या कंपनीतही तो काम करत होता. शिवाय 4 महिन्यांसाठी तो दुबईतही नोकरी करत होता.

इंडियन मुस्लिम युनाएट या नावाने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे दोघे चालवत होते. सीएए, एनआरसीविरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा हेतू होता. दोघेही ऑगस्ट-2019 पासून दिल्लीत राहात आहेत. त्याच्याकडे काही संशयास्पद कागदपत्रे सापडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या घरच्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे उघड झाले आहे. सामीचे वडील श्रीनगरमध्ये बादामी बाग कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष तर हिनाचे वडील क्लास वन सरकारी काँट्रॅक्टर आहेत.

हे दाम्पत्य दिल्लीत आत्मघातकी हल्ला करण्याची तयारी करत होते, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेच्या खुरासान मोड्युलशी संबंधित असल्याच्या संशयावरून या दोघांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून काही साहित्यही जप्त केले आहे.