आयएसचा दहशतवादी मुसाने भिरकावला न्यायाधीशांच्या दिशेने ‘बूट’

कोलकता : वृत्तसंस्था – आयएसचा दहशतवादी मोहम्मद मसीउद्दीन उर्फ अबू मुसा सध्या कोलकत्याच्या प्रेसीडेन्सी तुरुंगात बंद आहे. त्याला सेशन्स कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने न्यायाधीशांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयात सुनावणी सुरु असताना मुसाने न्यायाधीशावर बुट भिरकावल्याने कोर्टात एकच खळबळ उडाली. त्यामुळे सुनावणी थांबवावी लागली असून आता यापुढील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. तसेच मुसाला स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मुसाला आज दुपारी सेशन्स कोर्टात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने बूट भरकावल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मुसाला तात्काळ अटक करून बेड्या घालून तुरुंगात नेले. दहशतवादी मुसावर पश्चिम बंगालच्या बर्धमान येथे स्फोट घडवल्याचा आरोप आहे. त्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. त्यावेळी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आयएससाठी भारतात दहशतवाद्यांची भरती केल्याची कबुली दिली आहे. सुरुवातीच्या चौकशीनंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. मुसाला यापूर्वी अलीपूर तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी त्याने वॉर्डनवर हल्ला केला होता. त्याने वॉर्डनला पाईपने मारहाण केली होती.