Sangli News : इस्लामपुरमध्ये वाहतूक पोलिस कर्मचार्‍याला मद्यपी चालकाकडून धक्काबुक्की

इस्लामपूर/ सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कामेरी नाका येथून ते आष्टा नाकापर्यंत गुरुवारी दुपारी मद्यपान करून भरधाव वेगाने मालट्रक घेऊन निघालेल्या चालकाचा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ( Traffic Police) पाठलाग करत मद्यपी चालकास ताब्यात घेतले. हा पाठलाग कामेरी नाका, आष्टा नाका ते वाळवा फाटा इतक्या अंतरापर्यंत सुरू होता. हा प्रकार गुरूवारी दुपारी घडला. गोरख शिवाजी काशीद (रा. नराळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे या मद्यपी ट्रकचालकाचे नाव आहे.

या ट्रकचालकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्यासह वाहतूक अधिनियमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस किरण विक्रम मस्के यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख शिवाजी काशीद या मद्यपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. काशीद हा मद्यपान करून आपल्या ताब्यातील मालट्रक (क्र. एमएच १२-केपी- ३९९१) घेऊन सांगलीकडे जात होता. वाहतुकीस अडथळा होईल या पद्धतीने त्याने कामेरी नाका येथे ट्रक उभा केला होता. वाहतूक शाखेच्या मस्के यांनी त्याला वाहन बाजूला घेण्यास सांगत असता काशीद याने उद्धटपणे आपला ट्रक घेऊन भरधाव वेगाने निघाला. वाळवा फाटा येथे त्याला थांबविल्यानंतर त्याने वाहतूक पोलिसांशी वाद घालत उद्धट वर्तन केले. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करत आहेत.